Pune NCP Protest Pudhari
पुणे

Pune NCP Protest: सुनेत्रा पवार वक्तव्याविरोधात राष्ट्रवादीचे पुण्यात आंदोलन; काँग्रेस नेत्यांच्या माफीची मागणी

बालगंधर्व चौक आणि काँग्रेस भवनासमोर घोषणाबाजी; महिला नेतृत्वाचा सन्मान राखण्याचे आंदोलकांचे आवाहन

पुढारी वृत्तसेवा

पुणे: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत काँग्रेसच्या नेत्यांकडून करण्यात आलेल्या आक्षेपार्ह व अपमानास्पद वक्तव्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मंगळवारी पुण्यात जोरदार आंदोलन केले. बालगंधर्व चौकातील झाशीची राणी यांच्या पुतळ्यासमोर तसेच काँग्रेस भवनासमोर घोषणाबाजी करीत कार्यकर्त्यांनी तीव्र निषेध नोंदविला. महिला नेतृत्वाचा सन्मान राखण्याची मागणी करीत संबंधित नेत्यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणीही आंदोलकांनी केली.

बालगंधर्व चौक, जंगली महाराज रस्ता येथे प्रदीप देशमुख, सुभाष जगताप आणि राजलक्ष्मी भोसले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. या वेळी महिला नेतृत्वाचा अवमान करणारी भाषा अस्वीकार्य असल्याचे सांगत काँग्रेसविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यापासून आजपर्यंत महिलांनी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय नेतृत्व केले असून, त्यांच्या योगदानाचा सन्मान होणे अपेक्षित असताना त्यांच्याविषयी अपमानास्पद वक्तव्ये केली जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुसऱ्या गटाने सुनील टिंगरे आणि वैशाली नागवडे यांच्या नेतृत्वाखाली थेट काँग्रेस भवनावर मोर्चा काढला. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या वेळी आंदोलक पुढे सरसावल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये म्हणून पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करीत आंदोलकांना रोखले. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

आंदोलनादरम्यान महिला नेतृत्वाचा सन्मान राखणे ही प्रत्येक राजकीय पक्षाची नैतिक जबाबदारी असल्याचे आंदोलकांनी स्पष्ट केले. महिलांविषयी अवमानकारक वक्तव्यांमुळे समाजात चुकीचा संदेश जात असल्याचे सांगत संबंधित नेत्यांनी बिनशर्त माफी मागावी आणि भविष्यात अशा प्रकारची भाषा टाळावी, अशी मागणी करण्यात आली.

या आंदोलनामुळे बालगंधर्व चौक आणि काँग्रेस भवन परिसरात काही काळ पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला होता. आंदोलन शांततेत पार पडले असले, तरी या मुद्द्यावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT