पुणे : पुण्यात दिवसेंदिवस वाढणाऱ्या गुन्हेगारी घटनांमुळे नागरिक भयभीत झाले असून कायदा व सुव्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाने केला आहे. भरदिवसा खून, गोळीबार, कोयत्याचे वार, लूटमारी, टोळी युद्ध यांसारख्या घटना सर्रास घडत असून, पुणेकरांना दैनंदिन कामांसाठी घराबाहेर पडतानाही जीव मुठीत घेऊन बाहेर पडावे लागत असल्याचा आरोप करत मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली.(Latest Pune News)
बाजीराव रस्त्यावर मंगळवारी भर दिवसा तरुणाची निर्घृण हत्या झाली. या घटनेमुळे पुण्यात पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने अभिनव कला महाविद्यालय चौक येथे तीव आंदोलन केले. या वेळी आंदोलकांनी मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. आंदोलकांनी ‘राज्यात सत्ता भाजपची मात्र, राज्य गुन्हेगारांचे’ अशा घोषणा देत संपूर्ण परिसर दणाणून टाकला. या आंदोलनात डॉ. सुनील जगताप, किशोर कांबळे, मंजिरी घाडगे, असिफ शेख, अमोल परदेशी, अजिंक्य पालकर, विष्णू सरगर, अनिता पवार, रुपाली शेलार, मदन कोठुळे, रोहन गायकवाड, फाहीम शेख, सुमित काशीद, रमीझ सय्यद, हेमंत बधे, शिवराज मालवडकर, पूजा काटकर आणि शैलेंद्र भेलेकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
या वेळी शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले, राज्यात कायदा आणि सुव्यवस्था नावालाही शिल्लक नाही. स्वतःला पुण्याचे शिल्पकार म्हणवणारे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र बिहारमध्ये स्वतःच्या पक्षाचा प्रचार करण्यात व्यस्त आहेत. पुण्यात भरदिवसा खून, टोळी युद्धे, गोळीबार होत असताना प्रशासन झोपलेले आहे. फडणवीस यांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात आली.