पुणे : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांमध्ये आघाडी करताना १६५ जागांचा फॉर्म्युला ठरवण्यात आला होता. मात्र, हा फॉर्म्युला न पाळता दोन्ही पक्षांनी ऐनवेळी एकमेकांविरोधात उमेदवारांना एबी फॉर्म दिल्याने आघाडीचे गणित बिघडले आहे.
याच कारणामुळे दोन्ही पक्षांकडून अद्याप उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला असून उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी दोन्ही पक्षांकडून कोणते प्रयत्न केले जातात, हे पाहावे लागणार आहे. यासंदर्भात आज गुरुवारी (दि.१) दोन्ही पक्षांच्या नेत्यांची बैठक होण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) यांच्यात जागावाटप व चिन्हाबाबत सूत्र ठरले होते. त्यानुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने १२५ जागा, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने ४० जागा लढवण्याचे निश्चित झाले होते. दरम्यान, भाजप, मनसे, काँग्रेस आणि शिवसेना या पक्षांतील नाराज उमेदवारांची गेल्या दोन दिवसांपासून पवार यांच्याकडे मोठी गर्दी होत होती. त्यापैकी बहुतांश जणांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आल्याने दोन्ही राष्ट्रवादी पक्षांमधील ठरलेले सूत्र फिस्कटले.
प्रत्येक प्रभागात दोन्ही पक्षांचे मिळून चार उमेदवार असणे अपेक्षित असताना, अनेक प्रभागांमध्ये किमान सहा उमेदवार रिंगणात उतरले आहेत. एकाच जागेसाठी दोन उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आले असून, डमी म्हणून अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांनाही एबी फॉर्म दिल्याचे प्रकार समोर आले आहेत. तसेच काही ठिकाणी एकाच उमेदवाराला दोन प्रभागांसाठी एबी फॉर्म देण्यात आले आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये मोठा गोंधळ उडाला आहे. याच कारणामुळे उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर करण्यात आलेली नाही. यातील कोणते उमेदवार माघार घेणार, यावर लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे.
इच्छुकांना माघार घ्यायला लावताना पक्षनेत्यांची कसोटी लागणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत शुक्रवारी (दि. २ जानेवारी २०२६) दुपारी तीन वाजता संपणार असून, त्यानंतर अधिकृत उमेदवार कोण, हे स्पष्ट होणार आहे.