

पुणे : आश्वासक गायन आणि उभरत्या नृत्य कलाकारांचा पदन्यास, असा संगम 'संगीतसंध्या' या मैफलीच्या निमित्ताने पुणेकर रसिकांनी अनुभवला. गायिका दीपशिखा यांनी सादर केलेला राग बिहाग आणि जोडीला नृत्य कलाकार श्रुती जाधव आणि अंजना शुक्ला यांच्या डौलदार पदन्यासाला रसिकांनी भरभरून दाद दिली.
निमित्त होते महाराष्ट्र कल्चरल सेंटर आयोजित 'संगीतसंध्या' या विशेष सांगीतिक मैफलीचे. शनिवार पेठेतील सुदर्शन रंगमंच येथे पार पडलेल्या मैफलीची सुरुवात गायिका दीपशिखा यांनी 'राग बिहाग'ने केली. विलंबित तिलवाडा तालात निबद्ध 'तुमबिन चैन' या पारंपरिक रचनेतून त्यांनी बिहागचे स्वररूप उलगडले. त्यानंतर त्यांनी विविध रचना सादर करीत रसिकांची मने जिंकली.
श्रीपाद शिरवळकर, ऋतुराज धूपकर, अन्वी डेढिया यांनी साथसंगत केली. मैफलीच्या उत्तरार्धात श्रुती जाधव आणि अंजना शुक्ला या युवा कलाकारांनी कथक नृत्याचा आविष्कार दर्शविला. श्रुती आणि अंजना यांच्या नृत्यप्रस्तुतीसाठी आदित्य देशमुख (तबला), ऋतुराज धूपकर (संवादिनी), आसावरी पाटणकर (पढंत), अर्पिता वैशंपायन (गायन) यांनी साथसंगत केली. कथक गुरू नीलिमा अध्ये, भारतीय विद्या भवनचे संचालक नंदकुमार काकिर्डे उपस्थित होते. अपर्णा पानसे यांनी संयोजन केले. सृष्टी नवाथे यांनी सूत्रसंचालन केले.