मंचर: नवरात्र उत्सवासाठी देवींच्या मूर्ती बनवण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. यंदा मूर्तींच्या किमतीत सुमारे 30 टक्के वाढ झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. दरम्यान, आता प्लास्टर ऑफ पॅरिसवरील निर्बंध हटविल्याने कारागिरांना दिलासा मिळाला आहे.
मात्र सुरुवातीला बंदी होती. त्यामुळे अनेक कारखान्यांनी तशा मूर्ती बनविल्या नाहीत. परिणामी मागणी वाढली असली तरी त्याप्रमाणात मूर्तींचा पुरवाठा होणार नसल्याचेही विक्रेत्यांनी सांगितले. एकंदरीतच या नवरात्रीवर महागाईचे सावट असल्याचे स्पष्ट होत आहे. (Latest Pune News)
दोन फुटांपासून आठ फुटांपर्यंतच्या मूर्तींना मोठी मागणी आहे. दोन फुटांच्या मूर्तींची किंमत तीन ते साडेतीन हजार आणि आठ फुटांच्या मूर्तींची किंमत 14 ते 15 हजार रुपयांपर्यंत पोहचली आहे. अष्टभुजा देवीच्या मूर्तीला विशेष पसंती मिळत आहे. तुळजाभवानी, सप्तशृंगी, भारत माता आणि आंबा माता यांच्या मूर्ती देखील सजावटीच्या अंतिम टप्प्यात आहेत.
दरवाढीचे प्रमुख कारण म्हणजे प्लॅस्टर, काथ्या, रंग व मजुरी यांचे वाढलेले भाव. कोकणातून घाट माथ्यावर येणाऱ्या कारागिरांनीही मजुरी वाढवली आहे. यंदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असल्याने विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी देवी मंडळांना आर्थिक योगदान जाहीर केले आहे. त्यामुळे यंदाचा नवरात्र महोत्सव अधिक थाटामाटात साजरा होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मूर्तींच्या दरामध्ये जवळपास 30 टक्के वाढ झाली आहे. प्लॅस्टर, रंग, काथ्या आणि मजुरीचे भाव वाढल्याने आम्हाला मूर्ती बनवणे खर्चीक ठरत आहे.- यतीनकुमार कुलकर्णी, देवी बनविणारे कारखानदार, अवसरी खुर्द.
अष्टभुजा देवीच्या मूर्तींना सर्वाधिक मागणी आहे. साधारण दोन फुटांपासून ते आठ फुटांपर्यंतच्या मूर्तींवर अखेरचा हात फिरविण्याचे काम सुरू आहे. सजावट आणि दागिन्यांवर जास्त भर दिला जात आहे.- हेमंत कुलकर्णी, गणेश कोष्टी, कारागीर, अवसरी खुद
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विविध मंडळाला विविध पक्षांकडून आर्थिक मदत मिळत आहे. त्यामुळे यंदा देवीची स्थापना अधिक भव्य होणार आहे. भक्तांसाठी आकर्षक सजावट व सांस्कृतिक कार्यक्रमांची योजना सर्व मंडळानी आखली आहे.- प्रशांत बागल, उद्योजर्क.