Navale Bridge Pudhari
पुणे

Navale Bridge Traffic Congestion: नवले पूल ते वारजेपर्यंत वीकेंडला वाहतूक कोंडी; दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा

अपघात रोखण्यात यश, मात्र कोंडी कायम; अनधिकृत पार्किंग, सेवा रस्त्यांवरील अतिक्रमणे आणि वाहनांची वाढती संख्या ठरतेय डोकेदुखी

पुढारी वृत्तसेवा

प्रसाद जगताप

पुणे: पुणे शहराचे प्रवेशद्वार असलेल्या मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील नवले पूल परिसरात वीकेंडला म्हणजेच शनिवार आणि रविवारी वाहतूक कोंडीचे चित्र पाहायला मिळत आहे. विशेषतः रविवारी सायंकाळी पीक अवर्समध्ये कात्रजच्या नवीन बोगद्याजवळील सेल्फी पॉइंटपासून ते थेट वारजे पुलापर्यंत मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर वाहनांच्या दोन किलोमीटरपर्यंत लांब रांगा लागत आहेत.

गेल्या काही काळात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) केलेल्या तांत्रिक उपाययोजनांमुळे या भागातील जीवघेण्या अपघातांचे प्रमाण कमी झाले असले, तरी वीकेंडच्या वाहतूक कोंडीची समस्या मात्र जैसे थेच आहे. दै. 'पुढारी'च्या वतीने शनिवारी आणि रविवारी या संपूर्ण परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली असता, महामार्गावरील बेशिस्त व अनधिकृत पार्किंग, सेवा रस्त्यांवरील अतिक्रमणे आणि वाहनसंख्येपुढे अपुरे वाटणारे अरुंद रस्ते हीच या वाहतूक कोंडीमागील मुख्य कारणे असल्याचे समोर आले.

दै. 'पुढारी‌'च्या पाहणीत समोर आले बेशिस्त पार्किंगचे वास्तव

दै. ‌'पुढारी‌'ने या संपूर्ण पट्ट्याची पाहणी केली असता वाहतूक कोंडीची अनेक तांत्रिक आणि मानवी कारणे समोर आली. महामार्गाच्या दोन्ही बाजूंच्या सेवा रस्त्यांवर (सर्व्हिस रोड) आणि मुख्य महामार्गाच्या कडेला ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर अनधिकृत पार्किंग केलेले आढळून आले. विशेषतः खासगी वाहनचालक आपली वाहने प्रवासी चढवण्यासाठी आणि उतरवण्यासाठी मुख्य महामार्गावरच उभी करतात. याशिवाय, महामार्गाशेजारील हॉटेल्स, ढाबे, गॅरेज आणि स्थानिक व्यावसायिकांच्या ग्राहकांच्या गाड्या थेट सर्व्हिस रोडगतच उभ्या राहत असल्याने वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे. अवजड वाहनेही या वेळी रस्त्याच्या कडेला उभे केलेले दिसून आली.

अपघात रोखण्यात यश, पण कोंडीवर ठोस उपाय कधी?

गेल्या अनेक वर्षांपासून नवले पूल आणि सेल्फी पॉइंटचा तीव्र उतार हा वाहनचालकांसाठी मृत्यूचा सापळा म्हणून ओळखला जात होता. या तीव्र उतारावर अवजड वाहनांचे ब्रेक निकामी होऊन अनेक भीषण व जीवघेणे अपघात घडले होते. मात्र, या गंभीर समस्येची दखल घेत नॅशनल हायवे ॲथॉरिटी ऑफ इंडिया आणि पुणे शहर वाहतूक पोलिसांनी या पट्ट्यात अनेक सकारात्मक बदल केले. उतारावर वाहनांचा वेग कमी व्हावा, यासाठी पांढऱ्या-पिवळ्या रंगाच्या रम्बलर पट्ट्या बसवल्या. ठिकठिकाणी अत्याधुनिक स्पीड गन आणि सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित केले, धोक्याची सूचना देण्यासाठी मोठे मार्गदर्शक फलक लावले. यामुळे या भागातील अपघातांचे प्रमाण घटले आहे. ही समाधानाची बाब असली तरी, आता विकेंडच्या वाहतूक कोंडीची नवी डोकेदुखी येथे उभी राहिली आहे.

शनिवारी पुण्याबाहेर, तर रविवारी मुंबईकडे जाणारी लेन होतेय जाम

मुंबई, पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील लाखो नोकरदार, आयटी अभियंते आणि विद्यार्थी वीकेंडला पर्यटनासाठी लोणावळा, खंडाळा, महाबळेश्वर, कोकण किंवा आपल्या मूळ गावी जाण्याचे नियोजन करतात. त्यामुळे शनिवारी सकाळी आणि दुपारी महामार्गावर पुण्यातून बाहेर पडणाऱ्या महामार्गावर वाहनांचा प्रचंड ताण असतो. याउलट, रविवारी सायंकाळी सुटी संपवून पुन्हा परतणाऱ्या आणि साताऱ्याकडून मुंबईच्या दिशेने जाणारे पर्यटक व नागरिकांच्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढते. परिणामी, रविवारी सायंकाळी सेल्फी पॉइंट, भूमकर चौक, नवले पूल, वडगाव पूल आणि पुढे वारजे पुलापर्यंत महामार्गावर वाहनांची रांग लागलेली असते. सामान्य दिवसांत अवघ्या दहा ते पंधरा मिनिटांत पार होणारे हे अंतर कापण्यासाठी वीकेंडला वाहनचालकांना पाऊण ते एक तास लागत आहे. या कोंडीत रुग्णवाहिका आणि अत्यावश्यक सेवेतील वाहनेही अनेकदा अडकून पडत असल्याचे दिसते.

नवले पूल परिसरात अपघात रोखण्यासाठी आम्ही रम्बलर पट्ट्या, स्पीड कॅमेरे आणि मार्गदर्शक फलकांची मदत घेतली, ज्याला मोठे यश आले असून अपघात घटले आहेत. मात्र, वीकेंडला पर्यटक आणि गावी जाणाऱ्या वाहनांची संख्या दुप्पट होते. त्यामुळे या भागात वाहतूक कोंडी होते. महामार्गावर अनधिकृत पार्किंग करणाऱ्या वाहनांवर आम्ही नियमितपणे दंडात्मक कारवाई करत आहोत. शनिवार आणि रविवारी सायंकाळी कोंडी सोडवण्यासाठी नवले पूल ते वारजे या पट्ट्यात अतिरिक्त वाहतूक पोलिस तैनात केले जातील.
डॉ. संदीप भाजीभाकरे, पोलिस उपायुक्त, पुणे शहर वाहतूक विभाग
नवले पूल परिसरात अपघात रोखण्यासाठी झालेल्या उपाययोजनांचे आम्ही स्वागत करतो. मात्र, वीकेंडच्या वाहतूक कोंडीने सामान्य नागरिकांचे जगणे मुश्कील केले आहे. रिंग रोडची कामे संथगतीने सुरू असल्याचा फटका या महामार्गाला बसत आहे. महामार्ग प्राधिकरण, महापालिका आणि वाहतूक पोलिसांनी एकमेकांकडे बोट दाखवणे बंद करून संयुक्त बैठक घ्यावी आणि सेवा रस्त्यांवरील अतिक्रमणे व अनधिकृत पार्किंगवर तातडीने कारवाई करावी. तसेच सेवा रस्त्यांवरील पथदिवे बदलावेत. त्यांचा प्रकाश खूपच कमी पडत आहे.
तानाजी कांबळे, सामाजिक कार्यकर्ते

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT