पुणे : नवले पूल परिसरात वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने लागू केलेल्या 30 किमी प्रतितास वेगमर्यादेच्या निर्णयाला वाहतूकदारांकडून तीव विरोध करण्यात आहे. हा निर्णय सुरक्षेसाठी घेतला असला तरी, तीव उतारावर जड मालवाहतूक ट्रकना इतक्या कमी वेगाने चालवणे म्हणजे ‘बेक फेल’ला आमंत्रण असल्याचा गंभीर सवाल वाहतूकदारांनी उपस्थित केला आहे.
नुकत्याच झालेल्या भीषण अपघातांमध्ये ‘बेक फेल’ हे प्रमुख कारण समोर आले असताना स्वामीनारायण मंदिर ते नवले पूल यादरम्यान 30 किमी प्रतितास ही वेगमर्यादा मालवाहतूकदारांसाठी नवी डोकेदुखी ठरत आहे. वाहतूकदारांच्या म्हणण्यानुसार, तीव उतारावर 30 किमी प्रतितास वेगाने वाहन चालविण्यासाठी चालकाला बेकचा अतिरिक्त वापर करावा लागतो. यामुळे बेक ड्रम गरम होऊन ते निकामी होण्याची (बेक फेल) शक्यता वाढते तसेच टायरला आग लागण्याचा धोकाही वाढतो.
जर या 30 च्या वेगमर्यादेमुळे बेक फेल होऊन अपघात झाला, तर या निर्णयासाठी जबाबदार असणारे अधिकारी त्याची जबाबदारी घेणार का? नुसते ई-चलन काढून महसूल गोळा करण्यापेक्षा माणसाचा जीव मौल्यवान आहे, याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे. तसेच, अपघात झाल्यावर तत्काळ वेगमर्यादा लागू करून दंडात्मक कारवाईसाठी तत्पर असणारी यंत्रणा, योग्य व दीर्घकालीन उपाययोजना राबविण्यासाठी कधी तत्पर होणार? असा संतप्त सवालही वाहतूकदारांनी केला आहे.
मालवाहतूकदार, आरटीओ, वाहतूक विभाग आणि महानगरपालिकेचे प्रतिनिधी यांची एक संयुक्त कृती समिती स्थापन करावी, याबाबत वारंवार मागणी केली आहे. मात्र, अद्याप ती समिती स्थापन झालेली नाही. दर तीन महिन्यांनी आढावा बैठक घेऊन वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित करण्याच्या दृष्टीने पाऊल उचलण्याच्या मागणीकडे प्रशासनाने दुर्लक्षित केले आहे. नवले पूल परिसरात वारंवार होणारे अपघात थांबविण्यासाठी प्रशासनाने घेतलेला 30 किमी प्रतितास वेगमर्यादेचा निर्णय हा तातडीचा उपाय असला तरी, तो व्यावहारिक आणि सुरक्षित आहे की नाही? यावर तातडीने पुनर्विचार करणे गरजेचे आहे.
नवले पूल अपघातानंतर झालेल्या बैठकीत केंद्रीय राज्यमंत्री तथा पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी या परिसरातील वेगमर्यादा प्रतितास 30 किलोमीटर ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत. मात्र, याला वाहतूकदार विरोध करीत आहेत.