पुणे : आपल्या देशात रासायनिक शेतीमुळे मानवी आरोग्याचे गंभीर आव्हान उभे राहिले आहे. त्या आव्हानाला तोंड देण्यासाठी नैसर्गिक शेती हा प्रभावी पर्याय असून, पुढील पिढ्यांचे आरोग्य जपण्यासाठी प्रत्येक कुटुंबाला फॅमिली डॉक्टरपेक्षाही नैसर्गिक शेती करणारा शेतकरी अधिक गरजेचा ठरेल, असे मत राज्यपाल आचार्य देववत यांनी व्यक्त केले.
कृषी महाविद्यालय येथे आयोजित एक दिवसीय नैसर्गिक शेती परिषदेच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते. या वेळी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आणि कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी आदी उपस्थित होते.
राज्यपाल देववत म्हणाले, दहा वर्षांपूर्वी भारतीय नागरिकांच्या आहारपद्धतीचा अभ्यास करून जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) एक अहवाल सादर केला होता. त्यावेळी त्या अहवालात भारतात मधुमेह रूग्णांचा स्फोट होईल, असे सांगितले होते. आज देशात तीच परिस्थिती दिसून येत आहे. नैसर्गिक पीकपद्धती न अवलंबल्यास पुढील दहा वर्षांत देशात कॅन्सरचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळतील, असे डब्ल्यूएचओने सांगितले आहे. त्या दिशेने आपली वाटचाल सुरू आहे.
एकीकडे विकसित भारत बनविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी रात्र दिवस काम करत आहेत. मात्र आपण कॅन्सरशी लढत राहिलो तर विकसित भारत कसा बनेल? असा प्रश्नसुद्धा त्यांनी या वेळी उपस्थित केला.
रासायनिक शेती करून मित्रांना मारण्याचे काम आपण करत आहोत. 40 वर्षांपूर्वी कॅन्सर, मधुमेहासारखे आजार नव्हते. आताच हे आजार कसे होत आहेत. याचे कारण म्हणजे आपले खाद्य. अतिवृष्टी आणि दुष्काळ टाळण्यासाठी नैसर्गिक शेती गरजेची असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.
जमिनीतील सूक्ष्मजीव पोषक घटक रोपांपर्यंत पोहचवतात, पण रासायनिक शेतीत हे सूक्ष्मजीव नष्ट होत असल्याने जमिनीचा पोत बदलतो, अन्नातील पोषक घटक कमी होतात. युरियामधील नायट्रोजनमुळे नायट्रस ऑक्साइड तयार होत असल्याने कॅन्सरसारख्या रोगांमध्ये वाढ होत आहे. यापासून मुक्तता नैसर्गिक शेतीच देऊ शकते.
नैसर्गिक शेतीमुळे मातीत वाढणारी गांडुळे जमिनीत 10 फूट खोल पर्यंत छिद्रे तयार करतात, ज्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरते. देशी गांडुळाच्या प्रजाती आपल्या आयुष्यात 40 ते 50 हजार गांडुळे तयार करतात. त्यांच्या जीवनचक्राच्या शेवटी जमिनीला 17 प्रकारचे पोषक घटक मिळतात. जीवामृताच्या वापरामुळे जमिनीत सूक्ष्मजीवांची संख्या वाढते. देशी गायीच्या शेणात उपयुक्त जिवाणू मोठ्या प्रमाणात असतात.
रासायनिक शेती पद्धत पाश्चात्त्य देशांकडून आलेली आहे. एकेकाळी भारतीय जमिनीत ऑरगॅनिक कार्बनची मात्रा सुमारे 1.5 टक्के होती, ती आता 0.5 टक्क्यांपेक्षा कमी झाली आहे. हा घटक जमिनीच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असून, तो कमी झाल्याने जमिनी पडीक पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. तसेच रासायनिक शेती खर्चीक असल्याने शेतकरी कर्जबाजारी होत आहेत.
शेतकऱ्याला पिकांच्या नुकसानीपासून सावरण्यासाठी पशुपालन उत्तम जोडव्यवसाय आहे. पशुसंवर्धन विभागाने अधिक दूध देणाऱ्या देशी गायींचे बीड विकसित करण्यासाठी अधिक संशोधन करावे.
या वेळी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, आज कृषी बाजारपेठेत उत्पादनापेक्षा गुणवत्तेला जास्त महत्त्व मिळत असल्याने शेतीत परिवर्तन करण्याची गरज आहे. शास्त्रज्ञ व कृषी विद्यापीठांनी शेतकऱ्यांना नैसर्गिक
शेतीचे महत्त्व पटवून द्यावे. रस्तोगी यांनी राज्यात नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्याची भूमिका मांडली.
कृषी महाविद्यालय येथे आयोजित एक दिवसीय नैसर्गिक शेती परिषदेचे उद्घाटन राज्यपाल आचार्य देववत यांच्या हस्ते झाले. या वेळी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आदी.