पुणे

National Education Policy : ‘बीएड’साठी चार वर्षांचा एकात्मिक अभ्यासक्रम

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार शिक्षण क्षेत्रात मोठे बदल करण्यात येत आहेत. त्यानुसार राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद अर्थात एनसीटीईने चार वर्षांचा जुना एकात्मिक अभ्यासक्रम बंद करून नवीन चार वर्षांचा बीएड एकात्मिक अभ्यासक्रम आयटीईपी राबवण्याचा निर्णय घेतला आहे. जुना दोन वर्षांचा विशेष बीएड अभ्यासक्रम बंद केल्यानंतर एनसीटीईने आता जुन्या चार वर्षांचा बीएड अभ्यासक्रमही बंद करण्याची घोषणा केली आहे.

एनसीटीईने जाहीर केलेल्या नोटीसनुसार, शैक्षणिक सत्र 2025-26 पेक्षा जुना चार वर्षांचा एकात्मिक बीएड अभ्यासक्रम बंद केला जाईल. 2024-25 चे सत्र हे जुन्या चार वर्षांच्या बीएड अभ्यासक्रमाचे शेवटचे सत्र असेल. यानंतर या जुन्या अभ्यासक्रमासाठी नवीन प्रवेश होणार नाहीत. विविध शिक्षक प्रशिक्षण संस्थांमध्ये नवीन चार वर्षांचा बीएड एकात्मिक अभ्यासक्रम आयटीईपी सुरु केला जाईल. ज्या संस्था आधीचा चार वर्षांचे एकात्मिक बीएस्सी बीएड आणि बीए बीएड अभ्यासक्रम राबवत आहेत त्यांची मान्यता कायम राहील.

सध्या 2025 पर्यंत शैक्षणिक सत्र सुरू होण्यापूर्वी सुधारित नियमांनुसार नवीन एकात्मिक बीएड अभ्यासक्रम आयटीईपी बीएडमध्ये रूपांतरित होतील. नवीन शैक्षणिक धोरणातील तरतुदींनुसार 2030 नंतर ज्या शिक्षकांनी नवीन आयटीईपी चार वर्षांचा बीएड अभ्यासक्रम केला आहे अशाच शिक्षकांना शाळांमध्ये सामावून घेतले जाणार असल्याचे देखील एनसीटीईने स्पष्ट केले आहे.

आयटीईपी कोर्स म्हणजे काय?

एनसीटीईने शैक्षणिक सत्र 2023-24 पासून देशभरातील आयआयटी, एनआयटी केंद्रीय आणि राज्य विद्यापीठांसह 57 शिक्षक शिक्षण संस्थांमध्ये एकात्मिक शिक्षक शिक्षण कार्यक्रम सुरू केला. ही चार वर्षांची ड्युअल-कंपोझिट अंडरग्रॅज्युएट पदवी आहे. ती बीए बीएड, बीएस्सी बीएड आणि बीकॉम बीएड अभ्यासक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना मिळते. हा अभ्यासक्रम नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत दिलेल्या नवीन शालेय शिक्षण प्रणालीच्या पायाभूत, पूर्वतयारी, मध्यम आणि माध्यमिक (5+3+3+4) अशा 4 टप्प्यांसाठी शिक्षकांना तयार करणार आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT