नसरापूर: भोरकडून येणाऱ्या भरधाव मद्यधुंद कारचालकाने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दोघांना जोराची धडक दिली. यामध्ये ते दोघेही जागीच ठार झाले असून, यात आई आणि मुलाचा समावेश आहे. यामुळे तेलवडी गावावर मोठी शोककळा पसरली आहे.
कारमधील तरुण मद्यधुंद होते. या धिंगाणा करणाऱ्या संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा ग््राामस्थांनी घेतल्याने रात्री उशिरापर्यंत तणावाचे वातावरण राहिले होते. नंदा लक्ष्मण धावले (वय 55) आणि अमृत लक्षण धावले (वय 27, रा. तेलवडी, ता. भोर) अशी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या आई व मुलाचे नावे आहे. ही घटना भोर-कापूरव्होळ रस्त्यावरील कासुर्डी गु. मा. हद्दीत बुधवारी (दि. 31 डिसेंबर) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली.
तातडीने ग््राामस्थांनी गंभीर जखमी झालेल्या आई व मुलाला एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल केले. मात्र, उपचारांपूर्वीच दोघेही मृत्युमुखी झाल्याचे डॉ. राजेंद्र डिंबळे यांनी सांगितले. धडक दिल्यानंतर पळून जाणाऱ्या दोघांना ग््राामस्थांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. मात्र, इतर दोघे फरार झाल्याने घटनास्थळी मोठा असंतोष निर्माण झाला होता.
स्वप्निल सुनील पठारे (वय 37, रा. खराडी पुणे) असे चालक आरोपीचे नाव आहे. नंदा धावले ह्या त्यांचा मुलगा अमृत याच्या दुचाकीवरून शेतात गेल्या होत्या. या वेळी रस्त्यावर दुचाकी लावून शेतात जाण्यासाठी ते उभे होते. इतक्यातच पाठीमागून 200 फूट अंतरापासून सुसाट येणाऱ्या कारने दोघांना उडविले. यात या माय-लेकांचा दुर्दैवी अंत झाला. घटनास्थळी राजगड पोलिसांनी पंचनामा केला असून, कारचालकासह दोघांना ताब्यात घेतले आहे. अधिक माहिती देण्यास पोलिसांनी टाळाटाळ केली आहे.
पोलिसांच्या दुर्लक्षामुळेच अपघात
या कारमध्ये (एमएच 12 व्हीएन 0101) पठारेसह इतर तीन ते चार जण मद्यधुंद असल्याचे बोलले जात आहे. कारमध्ये दारूच्या बाटल्या, सिगारेट पॉकिटे, ग्लास आढळून आले. 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर भोर आणि राजगड पोलिसांनी अलर्ट राहून मद्यप्राशन करणाऱ्या वाहनधारकांची तपासणीसाठी पथके तैनात करणे गरजेचे असताना देखील इतर बंदोबस्ताच्या नावाखाली कानाडोळा केल्याने निष्पाप माय-लेकाचा मृत्यू झाला आहेे.