Sandeep Singh Gill Pudhari
पुणे

Nasrapur Case Investigation: नसरापूर चिमुकली हत्या प्रकरण: एसआयटीच्या वेगवान तपासामुळे आरोपीला फाशी

पुणे ग्रामीण पोलिसांनी अवघ्या १५ दिवसांत १,२०० पानी दोषारोपपत्र दाखल केले; वैज्ञानिक पुरावे आणि काटेकोर तपासाच्या आधारे न्यायालयाने आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली

पुढारी वृत्तसेवा

पुणे: नसरापूर येथील चिमुकलीवरील अत्याचार व हत्या प्रकरणाचा तपास पुणे ग्रामीण पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) अत्यंत काटेकोरपणे केला. पीडित चिमुकली आमच्या कुटुंबातीलच असल्याच्या भावनेने संपूर्ण पथकाने अहोरात्र मेहनत घेत अवघ्या १५ दिवसांत तब्बल १,२०० पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. या प्रकरणातील आरोपीला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावल्याने संपूर्ण पथकाच्या परिश्रमाचे समाधान आज मिळाले, अशी भावनिक प्रतिक्रिया पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी व्यक्त केली.

नसरापूर प्रकरणाचा निकाल लागल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी विशेष सरकारी वकील ॲड. अजय मिसर, उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्रसिंह गौर, पोलिस उपअधीक्षक राजेंद्र मायणे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजयमाला पवार, गुन्‍हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्ताजीराव मोहिते यांच्यासह एसआयटीमधील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

गिल म्हणाले, १ मे रोजी हा अमानुष गुन्हा घडल्यानंतर २ मे रोजी पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला. त्यावेळी परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, आरोपीविरुद्ध अवघ्या १५ दिवसांत दोषारोपपत्र दाखल करून त्याला कठोर शिक्षा होईल, अशी ग्वाही आम्ही आंदोलकांना दिली होती. त्यानुसार तपासाचे नियोजन करून प्रत्येक अधिकाऱ्यावर स्वतंत्र जबाबदारी सोपवली. तांत्रिक पुरावे, ई-साक्ष, वैज्ञानिक तपास यांचा प्रभावी वापर करण्यात आला. ते पुढे म्हणाले, या प्रकरणात न्यायालयाने उन्हाळी सुटीतही खटल्याचे कामकाज सुरू ठेवत कोणताही अनावश्यक विलंब होऊ दिला नाही. अवघ्या १६ दिवसांत ५५ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली.

पहिल्या पंचनाम्यानंतर दुसऱ्या पंचनाम्यावेळी आरोपीला घटनास्थळी न नेता पोलिस ठाण्यातून व्हर्च्युअल पंचनाम्याची प्रक्रिया राबविण्यात आली. त्यामुळे तपास अधिक प्रभावी आणि वेळेत पूर्ण करणे शक्य झाले. आरोपीने यापूर्वी वयाच्या ३५ व्या वर्षी ६५ वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. त्या प्रकरणात त्याची मुक्तता झाल्याने त्याचे मनोबल वाढले असावे. या प्रकरणात त्याने मृत्यूनंतरही चिमुकलीच्या मृतदेहावर लैंगिक अत्याचार केले. क्रौर्याचा हा कळस असून, यापेक्षा भीषण गुन्हा असू शकत नाही., असे ॲड. अजय मिसर म्हणाले.

हा पूर्वनियोजित आणि अत्यंत क्रूर गुन्हा

विशेष सरकारी वकील ॲड. अजय मिसर म्हणाले, आरोपी भीमराव कांबळेने हा गुन्हा पूर्वनियोजितपणे केला होता. त्याने आधीच घटनास्थळाची रेकी करून आवश्यक साहित्य तेथे ठेवले होते. 'गायीचे वासरू दाखवतो' असे सांगून त्याने अवघ्या तीन वर्षे दोन महिन्यांच्या चिमुकलीला गोठ्यात नेले. या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही चित्रीकरण उपलब्ध असून, ३९ मिनिटांच्या कालावधीत आरोपीने वारंवार अत्याचार केल्याचे त्यातून स्पष्ट झाले. आरोपीविरुद्धचे पूर्वीचे दाखले आणि इतर सर्व पुरावे न्यायालयासमोर सविस्तर मांडण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT