Law Pudhari
पुणे

Nasrapur Case: नसरापूर चिमुरडी हत्या प्रकरणात धक्कादायक पुरावे न्यायालयात सादर

आरोपीविरुद्ध शवविच्छेदन अहवाल, सीसीटीव्ही फुटेज आणि सायबर तज्ज्ञांचे पुरावे सादर करण्यात आले असून सुनावणीदरम्यान तपास अधिकाऱ्यांच्या साक्षीने खटल्याला वेग आला आहे

पुढारी वृत्तसेवा

पुणे: नसरापूर येथील चिमुरडीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणात आरोपी भीमराव कांबळे याने चिमुरडीचे अपहरण करून, तिचा विनयभंग केला आणि तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार करून तिची हत्या केली. कांबळे एवढ्यावरच थांबला नाही तर मुलीच्या मृत्यूनंतरही तिच्या शवावर अत्याचार केल्याची माहिती सरकारी वकिलांनी न्यायालयाला दिली.

मंगळवारी झालेल्या सुनावणीत हा मुद्दा ठळकपणे मांडत ससून रुग्णालयाच्या शवविच्छेदन अहवालातील निष्कर्ष न्यायालयासमोर सादर केले. या प्रकरणाच्या सुनावणीत मंगळवारी सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी सायबर तज्ज्ञाची साक्ष नोंदविली. तसेच अंतिम साक्षीदार आणि मुख्य तपास अधिकारी यांच्या साक्षीचा महत्त्वपूर्ण भाग न्यायालयात नोंदवण्यात आला.

ॲड. मिसर आणि त्यांचे सहायक वकील प्रथमेश शिंगणे यांनी साक्षीदारांची सरतपासणी घेत तपासातील विविध महत्त्वाच्या बाबी न्यायालयासमोर मांडल्या. साक्षीदरम्यान तपासाशी संबंधित पत्रव्यवहार, सीसीटीव्ही फुटेज, वैद्यकीय कागदपत्रे, शवविच्छेदन अहवाल, मृत्यूचे कारण आणि चिमुरडीवर झालेल्या अत्याचारांचे तपशील न्यायालयासमोर सादर करण्यात आले.

सरकार पक्षाच्या अंतिम साक्षीदाराची साक्ष नोंदवण्याची प्रक्रिया बुधवारी पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यानंतर आरोपींचे जबाब नोंदवले जातील आणि पुढील टप्प्यात अंतिम युक्तिवादास सुरुवात होईल. या खटल्याच्या सुनावणीसाठी मूळ फिर्यादीच्या वतीने अ‍ॅड. राधिका नावंदर-जोशी आणि अ‍ॅड. पाडेकर न्यायालयात उपस्थित होते.

मुख्य तपास अधिकाऱ्यांचा कंठ आला दाटून

खटल्यात साक्षीदारांची साक्ष नोंदविण्याचे काम सुरू आहे. मंगळवारी मुख्य तपास अधिकारी विजयमाला पवार यांची साक्ष नोंदविण्यात आली. या वेळी, मृतावर झालेले अत्याचार आणि मृतदेहावरील जखमांचे वर्णन करताना त्यांचा कंठ दाटून आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT