Pune Nashik Highway Traffic Pudhari
पुणे

Pune Nashik Highway Traffic: नाशिक फाटा-खेड उन्नत महामार्गाला अखेर गती; ६०० कोटींच्या भूसंपादनाचा मार्ग मोकळा

१४ हेक्टर जमीन संपादनासाठी १७५ कोटींची तरतूद; ३० किमीचा मार्ग पूर्ण झाल्यास पुणे-चाकण प्रवास अवघ्या २० मिनिटांत

पुढारी वृत्तसेवा

अविनाश दुधवडे

चाकण: पुणे ते नाशिक प्रवास वेगवान करण्यासाठी नाशिक फाटा ते खेड हा ३० किलोमीटरचा उन्नत महामार्ग प्रस्तावित आहे. सध्याच्या चारपदरी मार्गाचे रुंदीकरण करून सहापदरी महामार्ग, दुपदरी सेवा रस्ते आणि आठपदरी उन्नत महामार्ग, असा हा प्रकल्प आहे. चाकणसारख्या औद्योगिक क्षेत्रांतील वाहतूक कोंडीची समस्या यामुळे सुटणार आहे.

या प्रकल्पासाठी १४ हेक्टर म्हणजेच ३५ एकर भूसंपादनाची आवश्यकता आहे. त्यात पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण हद्दीत खेड तालुक्यातील चिंबळी, कुरुळी, नाणेकरवाडी, मेदनकरवाडी, चाकण, वाकी खुर्द आणि वाकी बुद्रुक या सात गावांतील १० हेक्टर भूसंपादनाचा समावेश आहे. याचबरोबर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील ४ हेक्टर भूसंपादनाचा समावेश आहे. या भूसंपादनासाठी सुमारे ६०० कोटी रुपयांचा निधी लागणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने ऑगस्ट २०२४ मध्ये या प्रकल्पाला मंजुरी देऊन दोन वर्षे उलटल्यानंतरही १४ हेक्टर भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण होऊ झालेली नाही.

या प्रकल्पासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने निविदाप्रक्रिया सुरू केली आहे. परंतु, १०० टक्के भूसंपादन झाल्याशिवाय कार्यादेश काढू नयेत, असे नियम आहेत. भूसंपादन पूर्ण झाल्यास तातडीने कार्यादेश काढून काम सुरू करण्यात येईल, अशी माहिती भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातील सूत्रांनी दिली. पुण्यात नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात या प्रकरणी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर नाराजी व्यक्त केली होती. मुख्यमंत्र्यांसमोरच त्यांनी राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांना याबाबत विचारणा केली.

भूसंपादन होत नसेल, तर प्रकल्पच रद्द करू, असा इशाराही त्यांनी दिला होता. यावर मुख्यमंत्र्यांनी भूसंपादन प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले होते. त्यानंतर वेगाने चक्रे फिरली आणि राज्य सरकारने तातडीने भूसंपादनासाठी १७५ कोटी रुपयांची तरतूद केली. नाशिक फाटा ते खेड उन्नत महामार्गाची एकूण लांबी – ३० किलोमीटर असून जमिनीवर – चारपदरीचे सहापदरीकरण आणि दुपदरी सेवारस्ते केला जाणार आहेत. उन्नत मार्ग – एकाच खांबावरील आठपदरी मार्ग असणार असून, प्रवासाचा सध्याचा दीड तासांचा वेळ अवघ्या २० मिनिटांवर येणार आहे.

५३ किलोमीटरच्या उन्नत मार्गालाही गती

तळेगाव-चाकण-शिक्रापूर या सुमारे ५३ किलोमीटर लांबीच्या उन्नत मार्गालाही राज्य सरकारने पुढे नेले आहे. हा मार्ग पूर्ण झाल्यानंतर मुंबई-पुणे महामार्ग, चाकण औद्योगिक पट्टा आणि पुणे-अहिल्यानगर मार्ग यांच्यातील मालवाहतूक अधिक सुलभ होण्याची अपेक्षा आहे. मात्र, उन्नत मार्ग पूर्ण होण्यासाठी काही वर्षे लागण्याची शक्यता असल्याने चार 'मिसिंग लिंक' आणि मुख्य बाह्यवळण हे तातडीने दिलासा देणारे प्रकल्प ठरणार आहेत.

एमआयडीसीची ४३७ कोटींची स्वतंत्र कामे

चाकण-तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील अंतर्गत रस्त्यांची स्थिती सुधारण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने स्वतंत्रपणे सुमारे ४३७ कोटी रुपयांची कामे हाती घेतली आहेत. यामध्ये चाकणच्या विविध औद्योगिक टप्प्यांतील रस्त्यांचे काँक्रीटीकरण, चार व सहापदरी रस्ते, सेवा रस्ते तसेच तळवडे माहिती-तंत्रज्ञान उद्यान-चाकण जोडरस्त्याचा समावेश आहे. जुन्या मुंबई-पुणे महामार्गाला तळेगाव-चाकणमार्गे पुणे-नाशिक महामार्गाशी जोडण्याचेही नियोजन आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT