नसरापूर: भीमराव प्रभाकर कांबळे याच्यावर यापूर्वीही गंभीर गुन्हे दाखल होते. त्याला या आधीच्या गुन्ह्यांत पुराव्याअभावी किंवा तक्रार मागे घेतल्यामुळे सोडून देण्यात आले होते. २०१५ मध्ये स्वतःच्या अल्पवयीन पुतणीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी तो तुरुंगात होता. १९९८ मध्ये त्याच्यावर एका ६२ वर्षीय वृद्ध महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप होता. याव्यतिरिक्त त्याच्यावर एका १७ वर्षीय मुलीच्या आणि एका जनावरासंदर्भातील गुन्ह्यांचा देखील आरोप होता.
अगोदर दोन गुन्ह्यांत जेलवारी करून देखील त्याच्यात सुधारणा झाली नव्हती. विकृत भीमराव कांबळे याने यापूर्वी अल्पवयीन मुलगी आणि ६२ वर्षीय वृद्धेवर करडी नजर ठेवून लज्जास्पद कृत्य केले होते. तर, स्वतःचे कुटुंब मोठे असूनदेखील त्याने संसाराचे काहीच देणेघेणे न बाळगता उनाड दिवस काढण्यात आयुष्य घालविले. त्याला पत्नी, सात मुली, एक मुलगा असा परिवार असताना देखील व्यसनाने ग्रासल्याने आले दिवस काढून किरकोळ हमाली करून स्वतःपुरता जगायचा, असा त्याचा दिनक्रम. भावनिक दया मिळवून नागरिकांकडून जेवण घेत असे. किरकोळ वस्तू चोऱ्यामाऱ्या करून दारूपुरते पैसे जमवून दिवसभर व्यसनात मग्न असायचा. लिंगपिसाट कांबळेने एका मुलीवर आणि एका महिलेवर अत्याचार केल्याने त्याला घरातून २०१५ मध्ये कुटुंबाने हाकलून दिले होते. तेव्हापासून नसरापूर बाजारपेठेत मिळेल ते काम करून गुजराण करीत होता.
सख्ख्या भावाच्या मुलीवरही अत्याचार
भीमरावने आपल्या सख्ख्या भावाच्या मुलीवरही असाच अत्याचार केला होता. यासाठी त्याला चार वर्षे येरवडा कारागृहात राहावे लागले होते. याशिवाय त्याच्यावर १९९८ मध्ये विनयभंगाचा आणि २०१५ मध्ये विनयभंग व पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हे दाखल झाले होते. मात्र, त्याची सुटका झाली होती. आधीच्या या गुन्ह्यात आरोपी मोकाट कसा सुटला? असा देखील प्रश्न आता विचारला गेला होता.
शिक्षेच्या वेळी कुटुंबाची पाठच
बालिकेच्या अत्याचार व खूनप्रकरणी कांबळेची पत्नी व त्याच्या मुलाने घडलेला गुन्हा लजास्पद असल्याचे सांगत माझ्या नराधम पतीला ठेचून मारा, नाहीतर फाशी द्या, त्याचा मृतदेह पण आम्हाला देऊ नका, त्याची तिक़डेच विल्हेवाट लावा नाहीतर मृतदेह कचऱ्यात फेकून द्या. परंतु, त्या चिमुरडीला न्याय द्या, अशी मागणी केली होती. निकालाच्या दिवशी देखील भीमरावच्या कुटुंबाने त्याला पाठच दाखवली.
फाशीच्या शिक्षेनंतर पुढे काय?
नसरापूर अपहरण, अत्याचार आणि खून प्रकरणात विशेष न्यायालयाने आरोपी भीमराव कांबळे याला फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू होणार आहे. सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली असली, तरी तिची अंमलबजावणी तातडीने होत नाही. कायद्यानुसार, फाशीच्या शिक्षेला मुंबई उच्च न्यायालयाची पुष्टी मिळणे बंधनकारक असल्याची माहिती जिल्हा व सत्र न्यायालयातील फौजदारी वकील ओंकार इनामदार यांनी दिली.
ॲड. इनामदार म्हणाले की, कनिष्ठ न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर त्या खटल्याची सर्व कागदपत्रे उच्च न्यायालयाकडे पाठवली जातात. या प्रक्रियेला 'कन्फर्मेशन केस' म्हटले जाते. उच्च न्यायालयाने शिक्षेला मंजुरी दिल्यानंतरच फाशीची शिक्षा अंतिम स्वरूपात कायम राहते. दरम्यान, लिमिटेशन ॲक्टनुसार दोषीला शिक्षेविरुद्ध उच्च न्यायालयात अपील दाखल करण्यासाठी शिक्षेच्या तारखेपासून सात दिवसांची मुदत असते. दोषी स्वतः किंवा त्यांचे वकील कारागृह अधीक्षकांमार्फत अपिलाचा मसुदा सादर करू शकतात. ॲड. अमृता मुळे म्हणाल्या की, उच्च न्यायालयात फाशीच्या शिक्षेच्या पुष्टीकरणाची प्रक्रिया आणि दोषीने दाखल केलेले अपील या दोन्ही बाबी एकत्रितपणे सुनावणीस घेतल्या जातात.
या वेळी न्यायालय संपूर्ण पुरावे आणि साक्षींची नव्याने छाननी करते. त्यानंतर उच्च न्यायालयाला फाशीची शिक्षा कायम ठेवणे, ती जन्मठेप किंवा अन्य शिक्षेत रूपांतरित करणे अथवा पुराव्याअभावी आरोपीची निर्दोष मुक्तता करणे, असे अधिकार आहेत. उच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा कायम ठेवल्यास दोषीला सर्वोच्च न्यायालयात अपील करण्याची संधी उपलब्ध असते. त्यानंतरही सर्व न्यायालयीन पर्याय संपल्यानंतर दोषीला भारताचे राष्ट्रपती किंवा संबंधित राज्याचे राज्यपाल यांच्याकडे दया याचिका दाखल करण्याचाही अधिकार कायद्यात देण्यात आला असल्याचे ॲड. मुळे यांनी नमूद केले.
अतिशय थंडपणे, क्रूरतेने केले चिमुकलीवर अत्याचार, हत्या भर चौकात फाशी देण्याची आता होतेय मागणी
नसरापूर येथे लहान चिमुरडीवर अत्याचार करून हत्या प्रकरणातील नराधम आरोपी भीमराव प्रभाकर ऊर्फ पर्वती कांबळे याला अखेर मरेपर्यंत फाशीची शिक्षा मिळाली. स्थानिक पातळीवर नागरिकांकडून या निर्णयाचे स्वागत होत असून, अशा नराधम आरोपीला भर चौकात फाशी देण्याची उद्विग्न भावना उमटत आहे.
१ मे रोजी नसरापूर परिसरात साडेतीन वर्षांच्या या पीडित बालिकेला दुपारी भीमराव कांबळे याने वासरू दाखवण्याचा बहाणा करून गोठ्याकडे नेले. तिच्यावर तब्बल ३९ मिनिटे अमानुष अत्याचार केला, त्यानंतर गळा दाबून खून करून मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला. २ मे रोजी पोलिसांनी अवघ्या काही तासांत ६५ वर्षीय भीमराव कांबळेला अटक केली. कांबळेने पोलिसांसमोर गुन्ह्याची कबुली दिली. घटनेनंतर संतापलेल्या ग्रामस्थांनी व नातेवाइकांनी सलग दोन दिवस पुणे-सातारा महामार्गावरील चेलाडी आणि पुणे शहरातील नवले पुलावर रास्ता रोको आंदोलन केले, तर या अमानवी कृत्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली. आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करीत मोठी निदर्शने करण्यात आली. पीडित चिमुरडी ही मूळची पुणे शहरातील डीएसके विश्व धायरी येथे राहणारी आहे. उन्हाळी सुट्टीसाठी आपल्या आजोळी नसरापूर येथे ती आली होती. त्या वेळी ही दुर्दैवी घटना घडली. घटना उघडकीस आली त्या वेळी नसरापूर येथे प्रचंड जनक्षोभ उसळला होता. 'आरोपीला आमच्या ताब्यात द्या' अशी मागणी करीत नागरिकांनी मोठे आंदोलन केले. पुणे-बंगळुरू महामार्ग रोखला. दोन दिवस नसरापूरचे वातावरण अतिशय संतप्त होते. आमदार शंकर मांडेकर, माजी आमदार संग्राम थोपटे, आमदार रोहित पवार यांच्यासह अनेक राजकीय आणि समाजिक नेत्यांनी नसरापूरकडे धाव घेतली होती.