

लोणावळा: महाराष्ट्रासह संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या मावळ तालुक्यातील लोहगड किल्ल्यावरील केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयल व तिचा प्रियकर चेतन चौधरी यांच्या पोलिस कोठडीची मुदत सोमवारी (दि. २९) संपत असल्याने त्यांना वडगाव मावळ सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर आरोपींच्या पोलिस कोठडीत आणखी ५ दिवसांची (३ जुलैपर्यंत) वाढ केली आहे. तपासातील अनेक महत्त्वाच्या आणि शिल्लक बाबींचा छडा लावण्यासाठी ही कोठडी मंजूर करण्यात आली आहे.
सोमवारी दुपारी तीन वाजता दोन्ही आरोपींना कडक पोलिस बंदोबस्तात न्यायालयात हजर करण्यात आले. सरकारी वकील आणि पोलिसांच्या वतीने आरोपींची ७ दिवसांची पोलिस कोठडी मागण्यात आली. ही मागणी करताना सरकारी वकील म्हणाले, की आरोपींनी केतनच्या हत्येचा कट रचल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. मात्र, हा कट नेमका कुठे बसून रचला आणि त्यांनी लोहगडावर जाऊन आधी रेकी केली होती का? याचा तपास करणे बाकी आहे. सियाला केतनसोबत बाली येथे प्री-वेडिंग शूटला जायचे नव्हते. याच कारणास्तव तिने पासपोर्ट फाडले होते. आता पोलिसांना या प्रकरणात केतनचा बेपत्ता असलेला पासपोर्ट शोधायचा आहे. यासाठी पोलिसांनी सात दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी केली.
गुन्ह्याची साखळी जोडण्यासाठी सियाप्रमाणेच आता चेतन चौधरीलाही घटनास्थळी (लोहगड किल्ला) घेऊन जाऊन गुन्ह्याचे नाट्य रूपांतर करायचे आहे. तसेच, त्यांनी लोहगडावर आणखी कोणाशी संवाद साधला होता, याचा शोध घ्यायचा आहे. केतनचा मोबाईल मृत्यूच्या काही काळानंतर नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला होता. या मोबाईलमधील महत्त्वाचा डेटा डिलीट करण्यात आला असून, तो रिकव्हर करायचा आहे. आरोपींनी अनेक गोष्टी लपवून ठेवल्या असून, त्या हस्तगत करणे गरजेचे आहे. या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का?, याचाही तपास करायचा असल्याने पोलिसांनी सात दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती.
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर, न्यायालयाने तपासातील शिल्लक बाबींचे गांभीर्य लक्षात घेतले. केवळ तांत्रिक तपास उरला नसून, गुन्ह्यातील महत्त्वाचे पुरावे जसे की केतनचा पासपोर्ट आणि मोबाईल डेटा हस्तगत करणे आणि गुन्ह्याचे मूळ शोधणे गरजेचे असल्याचे मानत, न्यायालयाने आरोपींची ३ जुलैपर्यंत म्हणजेच ५ दिवसांसाठी पोलिस कोठडीत रवानगी केली आहे. आता या ५ दिवसांच्या वाढीव कोठडीत पोलिस या हाय-प्रोफाईल प्रकरणातील कोणते नवीन धागेदोरे समोर आणतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. केतन अग्रवालसाठी सरकारी वकील राजेश्वरी वीरकुड तर, बचाव पक्षाच्या वतीने सिया गोयलसाठी विपुल दुशिंग, आशुतोष श्रीवास्तव, चेतन चौधरीच्या वतीने राधिकेश उत्तरवार, राम शहाणे व राहुल राजिवडे यांनी काम पाहिले.
आरोपींच्या वकिलांचा प्रतियुक्तिवाद
दुसरीकडे, आरोपी सिया गोयलचे वकील विपुल दुशिंग यांनी पोलिसांच्या मागणीला तीव्र विरोध केला. आरोपींना केलेली अटक कायद्याला धरून आहे का? आमचा अर्ज आधी दाखल करून घ्या, अशी मागणी त्यांनी न्यायालयाकडे केली. या प्रकरणातील तांत्रिक तपास, चौकशी आणि नाट्य रूपांतर आधीच झाले आहे. आता पुढील तपास पूर्णपणे तांत्रिक स्वरूपाचा असल्याने अधिकच्या पोलिस कोठडीची कोणतीही गरज नाही. केवळ केतनच्या आई-वडिलांच्या म्हणण्यावरून याला हत्या म्हणता येणार नाही, हा दरीत पडून झालेला मृत्यू असू शकतो. तसेच, हा गुन्हा जामीनपात्र स्वरूपाचा असल्याने न्यायालयाने पोलिस कोठडी देऊ नये, असा युक्तिवाद आरोपींच्या वकिलांनी केला.