पुणे

वडगाव मावळ : 2024 ला नरेंद्र मोदीच पंतप्रधान होतील : रेल्वे राज्यमंत्री दानवे यांचा दावा

अमृता चौगुले

वडगाव मावळ : देशातल्या जनतेवर सर्वांत जास्त अन्याय, अत्याचार काँग्रेसने केला आहे. देशाच्या लोकशाहीची हत्या काँग्रेसनेच केली, अशी टीका करून 2024 ला नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान होतील, असा विश्वास रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला. मावळ तालुका भाजपच्यावतीने 'मोदी 9' अभियानांतर्गत वडगाव मावळ येथील भेगडे लॉन्समध्ये आयोजित लाभार्थी संमेलन कार्यक्रमात ते बोलत होते.

या वेळी माजी राज्यमंत्री संजय भेगडे, आमदार अश्विनी जगताप, प्रशांत ठाकूर, उमा खापरे, बाळासाहेब पाटील, धैर्यशील पाटील, चंद्रकांत नखाते, जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे, महिलाध्यक्षा सायली बोत्रे आदी उपस्थित होते. देशाला मजबूत व पुढच्या 25 वर्षांचा विचार करणारा पंतप्रधान मिळाला आहे. 2024 ला नरेंद्र मोदी हेच पुन्हा पंतप्रधान होतील हे लोकांचे ठरवले आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

शिंदे-फडणवीस सरकारमुळे कोट्यवधींचा निधी मिळाला

माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर मावळ तालुक्यातील सुदुंबरे तीर्थक्षेत्रसाठी 68 कोटी, भंडारा डोंगर प्रवेशद्वारसाठी 14 कोटी, यासह वडगावसाठी 11 कोटी, तळेगावसाठी 12 कोटी, लोणावळासाठी 15 कोटी तसेच मावळ तालुक्याच्या ग्रामीण भागासाठी 70 कोटी रुपयांचा निधी दिला असल्याचे सांगून खर्‍या अर्थाने मावळच्या विकासाला पुन्हा सुरुवात झाली असल्याचा विश्वास व्यक्त केला.

मावळ लोकसभा मतदारसंघाची केली मागणी

जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देशात आणि देशाबाहेर केलेल्या कौतुकास्पद कामगिरीचा आलेख मांडला. तसेच, मावळ तालुका भाजपचा बालेकिल्ला आहे, चिंचवड, पनवेलमध्ये भाजपचे आमदार आहे, पिंपरी चिंचवडमध्ये भाजपची सत्ता आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत मावळ लोकसभा मतदारसंघाची जागा भाजपला मिळाली पाहिजे, अशी मागणी केली.

तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे यांनी केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून मावळ तालुक्यात होत असलेल्या विविध योजनांचा अंमलबजावणीबाबत माहिती दिली. माजी राज्यमंत्री भेगडे यांच्या माध्यमातून तालुक्यात झालेली विकासकामांचा उल्लेख करत आमदार शेळके यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली व आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत भाजपचाच विजय होईल, असा विश्वास व्यक्त केला. अनंता कुडे यांनी स्वागत केले, किरण राक्षे यांनी प्रस्ताविक केले. बाबूलाल गराडे यांनी सूत्रसंचालन केले तर चंद्रकांत नखाते यांनी
आभार मानले.

गांधी यांनी परदेशात केली लोकशाहीची बदनामी

रेल्वे राज्यमंत्री दानवे यांनी या वेळी बोलताना प्रामुख्याने काँग्रेस व भाजपा विरोधात एकत्र आलेल्या प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांवर सडकून टीका केली. पंतप्रधान मोदी यांनी कोरोना काळात 140 कोटी जनतेला मोफत लस दिली, मोफत अन्नधान्य, 100 रुपयांत गॅस कनेक्शन, हर घर नळ अशा विविध योजना देऊन शेतकर्‍यांच्या खात्यावर 6 हजार रुपयेही दिले. याशिवाय आपल्या देशाची मान जगात उंचावली आहे. असे असताना राहुल गांधी परदेशात जाऊन आपल्या लोकशाहीची बदनामी करतात तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मात्र आपल्या लोकशाहीचा गौरव करतात. त्यामुळे खर्‍या अर्थाने भारतीय लोकशाहीची हत्या ही काँग्रेसने केली असल्याचा आरोप केला.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT