बारामती : धनगर समाजाच्या योजना प्रभावीपणे राबवू ; भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांची ग्वाही | पुढारी

बारामती : धनगर समाजाच्या योजना प्रभावीपणे राबवू ; भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांची ग्वाही

बारामती : पुढारी वृत्तसेवा :  धनगर समाजाला राजकीय प्रवाहात आणण्यासाठी भाजप कार्यशील आहे. शिवसेना-भाजप सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेळी-मेंढी विकास महामंडळासाठी 10 हजार रुपये कोटींची तरतूद केली आहे. शासनाच्या योजना प्रभावीपणे राबवू, अशी ग्वाही भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. बारामती येथे अभिजित देवकाते व मित्र परिवाराच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 298व्या जयंतीचे आयोजन करण्यात आले होते. बावनकुळे यांना अहिल्याभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. आमदार राम शिंदे, राहुल कुल, माजी मंत्री विजय शिवतारे, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, भाजपचे सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, उपाध्यक्ष राजेश पांडे, ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे, रंजन तावरे, पृथ्वीराज जाचक, उज्ज्वला हाके, नवनाथ पडळकर, दिलीप खैरे, अविनाश मोटे, पांडुरंग कचरे, सतीश फाळके आदी या वेळी उपस्थित होते.

बावनकुळे म्हणाले, समाजातील युवकांना मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे आहे. रोजगारभिमुख शिक्षण गरजेचे आहे. राज्य सरकराने धनगर समाजासाठी एक हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. आमदार राम शिंदे यांनी पवारांवर जोरदार निशाणा साधला. गेल्या 32 वर्षांत शरद पवार कधीही जयंती सोहळ्याला उपस्थित राहिले नाहीत. यंदाच ते का येत आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले. खासदार सुप्रिया सुळे यांनी यापूर्वी कधी पालखीत भाकर्‍या थापल्या होत्या का, यंदाच त्यांना पालखीची आठवण कशी आली, असा सवाल त्यांनी केला. विजय शिवतारे यांनीही राष्ट्रवादीवर जोरदार हल्लाबोल केला. कारखाने असो की अन्य संस्था प्रत्येक ठिकाणी त्यांनी घुसखोरी केली अशी टीका त्यांनी केली. नितीन मदने, मच्छिंद्र टिंगरे, समृद्धी कोकरे आदींचेही भाषण झाले. प्रास्ताविक अभिजित देवकाते यांनी केले. सूत्रसंचालन कुमार देवकाते यांनी केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 300 व्या जयंतीला बारामतीत
299वी जयंती बारामतीत देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत साजरी होईल. लोकसभा निवडणुकीनंतर पुन्हा नरेंद्र मोदी हेच पंतप्रधानपदी विराजमान होतील. बारामतीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 300वी जयंती त्यांच्या उपस्थितीत व्हावी यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.

Back to top button