पुणे

नारायणगाव : बदलत्या हवामानाचा फळबागांना फटका

Laxman Dhenge

नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा : गेली चार ते पाच दिवसांपासून वातावरणात प्रचंड प्रमाणात बदल होत असल्याचे दिसून येत आहे. तालुक्यातील अनेक भागांत अवकाळी पाऊस झाला, तर काही ठिकाणी गारपीट झाली आहे. तसेच गेली काही दिवस दाट धुके व ढगाळ हवामानामुळे सूर्याचे दर्शन देखील झालेले नाही. अशा वातावरणाचा फटका फळबागांसह शेतीपिकांना बसू लागला आहे, त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे.

तालुक्यातील पूर्व भागातील राजुरी, उंचखडक, बेल्हे, आणे पठार या भागात गहू, हरभरा, भाजीपाला, कोबी, फ्लॉवर, टोमॅटो ही बागायती पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. तसेच आंबा, चिकू, सीताफळ द्राक्ष व डाळिंब तसेच कांदा लागवडीचे क्षेत्रही मोठ्या प्रमाणात आहे. अवकाळी पाऊस, दाट धुके व ढगाळ हवामानाचा परिणाम या फळबागांवर होत आहे. आंबा मोहोरची गळती वाढली आहे, त्यामुळे यंदा आंबा उत्पादन घटणार आहे. परिणामी यंदा आंब्याची चव ग्राहकांना महागात पडण्याची शक्यता आहे.

कांद्याची पात पिवळी पडू लागली

कांदा पीक चांगले होते. मात्र, रोगट हवामानामुळे कांद्याची पात पिवळी पडू लागली आहे. अवकाळी पावसाने भाजीपाला, टोमॅटो, बटाटा, कोबी, फ्लॉवर यावर केलेली फवारणी वाया जात आहे. तसेच, उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता खांबुडी येथील शेतकरी संदीप गंभीर यांनी व्यक्त केली आहे. उत्पादन चांगले येईल या आशेने खतांचा वापर, महागडी कीटकनाशक फवारणी, खुरपणी, यासाठीचा खर्च वाढला आहे. उत्पादन चांगले आले तर बाजारभावाची शाश्वती नाही, अशा कात्रीत बळीराजा सापडलेला दिसून येतोय.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT