मांडवगण फराटा परिसरात दिवसाढवळ्या बिबट्याचा वावर; नागरिकांमध्ये भीती | पुढारी

मांडवगण फराटा परिसरात दिवसाढवळ्या बिबट्याचा वावर; नागरिकांमध्ये भीती

मांडवगण फराटा : पुढारी वृत्तसेवा : शिरूर तालुक्याच्या पूर्व भागातील मांडवगण फराटा येथील 11 मैल वस्तीवर उसाच्या शेतामध्ये दिवसाढवळ्या शेतकर्‍याला बिबट्या दिसून आला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागाने तातडीने पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

शेतकरी हनुमंत फराटे हे रविवारी (दि. 14) सकाळी 8 वाजेच्या सुमारास 11 मैल येथील त्यांच्या उसाच्या शेतामध्ये पाणी देण्यासाठी गेले होते. या वेळी अचानक त्यांच्यासमोर बिबट्या जाताना त्यांना दिसून आला. प्रसंगावधान राखत फराटे हे उसाच्या आड शांतपणे उभे राहिले. काही वेळाने बिबट्या तेथून निघून गेल्यानंतर ते घरी परतले.

याबाबत त्यांनी वनविभागास माहिती कळवली. मांडवगण फराटा परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्या असल्याची चर्चा सुरू होती, परंतु रविवारी अचानक बिबट्याचे दर्शन झाले. सध्या परिसरामध्ये ऊसतोड सुरू आहे. ऊसतोड कामगारांसह त्यांची लहान मुले यांनी उसाच्या शेतात तोड सुरू असताना विशेष खबरदारी घेण्याची गरज आहे. तसेच नागरिकांनी देखील काळजी घेण्याचे आवाहन फराटे यांनी केले आहे.

हेही वाचा

Back to top button