नारायणगाव: ऑनलाईन गुंतवणुकीच्या नावाखाली नागरिकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय रॅकेटविरोधात नारायणगाव पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. आयएक्स ग्लोबल, टीपी ग्लोबल एफएक्स, क्रिप्टो लँड, डेट बॉक्स आणि एफएक्स-ओप्युलन्स या नावाने बनावट गुंतवणूक अॅप तयार करून त्यामार्फत आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी ५७ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी कोलकाता येथील हेअर स्ट्रीट पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या शून्य प्रथम माहिती अहवालाच्या आधारे नारायणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता २०२३ मधील विविध कलमांनुसार हा गुन्हा नोंदविण्यात आला असून संबंधित कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर तपासाची सूत्रे नारायणगाव पोलिसांनी हाती घेतली आहेत.
प्राथमिक तपासात आरोपींनी विविध बनावट गुंतवणूक अॅप तयार करून नागरिकांना मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वारंवार पैसे गुंतवून घेतल्याचे निष्पन्न झाले आहे. गुंतवणुकीवर ५ ते २५ टक्के नफा मिळेल, असे सांगून अनेकांची दिशाभूल करण्यात आली. सुरुवातीला काहींना परतावा देऊन विश्वास संपादन करण्यात आला. त्यानंतर अधिकाधिक रक्कम गुंतविण्यास प्रवृत्त करून मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक करण्यात आल्याचा आरोप आहे.
या प्रकरणात बहुस्तरीय विपणन योजना पीडित संघटनेचे अध्यक्ष सुनील खुनाथ पाटोळे (रा. नारायणगाव) यांचा साक्षीदार म्हणून जबाब नोंदविण्यात आला आहे. त्यांनी विविध बनावट गुंतवणूक अॅपमध्ये पैसे गुंतविण्यास प्रवृत्त करून १ कोटी १३ लाख ३१ हजार ७८२ रुपयांची फसवणूक झाल्याची माहिती पोलिसांना दिली आहे.
या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सपकाळे करीत असून, इतर साक्षीदारांचे जबाब नोंदविण्याचे काम सुरू आहे. तसेच या आर्थिक फसवणुकीच्या जाळ्यात सहभागी असलेल्या इतर आरोपींचा शोध घेऊन संपूर्ण व्यवहाराची साखळी उघड करण्यासाठी पोलिसांकडून अधिक तपास सुरू असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सपांगे यांनी दिली.