Gram Panchayat Pudhari
पुणे

Narayangaon Gram Panchayat Inquiry: नारायणगाव ग्रामपंचायतीच्या आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी होणार; २७ नोव्हेंबरला दप्तर तपासणी

घरपट्टी महसूल अपहार, अनधिकृत पावत्या आणि ८-अ नोंदींतील फेरबदलाचे आरोप; पंचायत समिती शिरूरकडून चौकशीचे आदेश

पुढारी वृत्तसेवा

नारायणगाव: नारायणगाव (ता. जुन्नर) ग्रामपंचायतीच्या आर्थिक कारभारातील कथित गैरव्यवहारांबाबत दाखल करण्यात आलेल्या तक्रारीची आता सखोल चौकशी होणार आहे. आर्थिक गैरव्यवहार, अनधिकृत पावती वाटप, अज्ञात बँक खात्यांचा वापर, घरपट्टी महसुलाचा अपहार तसेच खरेदी नसताना परस्पर ८-अ नोंदी कमी करणे आदी गंभीर मुद्द्यांचा चौकशीत समावेश आहे.

या प्रकरणाची दप्तर तपासणी, प्रत्यक्ष स्थळपाहणी आणि संबंधितांचे जबाब नोंदविण्यासाठी पंचायत समिती शिरूरचे गटविकास अधिकारी महेश ढोके यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. नारायणगाव येथील तक्रारदार कनिका कपिल खैरे यांनी ग्रामपंचायतीच्या आर्थिक व्यवहारांबाबत तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेत पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या ३० ऑक्टोबर २०२६ रोजीच्या आदेशानुसार सखोल दप्तर तपासणी व चौकशी करण्यासाठी पंचायत समिती शिरूरकडून चौकशी अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत.

त्यानुसार शुक्रवार, दि. २७ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता नारायणगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रत्यक्ष चौकशी होणार आहे. यावेळी संबंधित कागदपत्रांची तपासणी, स्थळपाहणी तसेच तक्रारीतील मुद्द्यांबाबत संबंधितांचे जबाब नोंदविण्यात येणार आहेत.

या चौकशीसाठी नारायणगाव ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी (ग्रामसेवक) यांना तक्रारीशी संबंधित सर्व दप्तर अद्ययावत करून चौकशीच्या वेळी उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच तक्रारदार कनिका खैरे यांनाही चौकशीच्या वेळी मूळ पुरावे व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचे कळविण्यात आले आहे. या चौकशीसाठी पंचायत समिती शिरूरचे विस्तार अधिकारी (पंचायत) तसेच संबंधित अधिकारी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे नारायणगाव ग्रामपंचायतीच्या आर्थिक व्यवहारांबाबत करण्यात आलेल्या तक्रारीतून नेमकी कोणती वस्तुस्थिती समोर येते, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

चौकशीअंती संबंधित आर्थिक व्यवहारांमधील अनियमितता स्पष्ट होणार का आणि तक्रारीतील आरोपांबाबत कोणते तथ्य समोर येणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान याबाबत नारायणगावचे उपसरपंच योगेश पाटे यांच्याशी भ्रमणधरून संपर्क साधला असता ते म्हणाले की, तक्रारदाराच्या तक्रारीनुसार नारायणगाव ग्रामपंचायत दप्तर तपासण्यासाठी २७ तारखेला संबंधित अधिकारी येणार आहेत. याबाबतचे पत्र ग्रामपंचायतीला देखील प्राप्त झाले आहे. ग्रामपंचायत तक्रारीला सामोरे जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT