नारायणगाव: देव्हाऱ्यातील देव व सोन्याचे दागिने पॉलिश करून देतो, असे सांगत शिरोली बुद्रुक येथे लक्ष्मण शंकर बोऱ्हाडे व त्यांच्या पत्नी विमल लक्ष्मण बोऱ्हाडे या ज्येष्ठ दाम्पत्याचे सहा तोळे वजनाचे सोन्याचे दागिने दोन चोरट्यांनी लंपास केले. ही घटना गुरुवारी (दि. 20) दुपारी 12 वाजेच्या सुमारास घडली. तीन तोळ्याचे मंगळसूत्र, एक सोन्याची माळ व दीड तोळ्याची चेन या चोरट्यांनी लंपास केली.
याबाबत समजलेली माहिती अशी की, गुरुवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास दुचाकीवरून हे दोन चोरटे आले. या वृद्ध दाम्पत्याला चोरटे म्हणाले की, तुमच्या देव्हाऱ्यातील देव उजळून देतो तसेच सोने- चांदी पॉलिश करून देतो.
त्यानंतर या चोरट्याने घरातील चांदीचा देव उजळून दिला. त्यानंतर दाम्पत्याकडील सोन्याचे दागिने मागून घेतले. या दागिन्यावर चोरट्यांनी तपकिरी रंगाची पावडर टाकून त्यांनी एक झाकणाचा स्टीलचा डबा आणायला या दाम्पत्याला सांगितला.
तोपर्यंत त्यांनी हे दागिने स्वतःकडे लपवून ठेवले. ’या डब्यात पाणी घेऊन त्यात हळद टाकून दागिने टाकले आहेत. पावडर लावलेला हा सोन्याचा डबा गॅसवर उकळवा. पाच मिनिटांनी डबा उघडा’ असे सांगून त्यांनी या दाम्पत्यास एक छोटी पावडरची पिशवी देऊन यात पॉलिश पावडर असल्याचे सांगितले व तेथून ते निघून गेले.
काही वेळानंतर लक्ष्मण बोऱ्हाडे यांनी डबा उचकून पाहिला असता त्यात दागिने नसल्याचे त्यांच्या लक्षात आले.आपली फसवणूक झाल्याने त्यांच्या लक्षात आल्यानंतर मुलगा मल्हारी बोऱ्हाडे यांनी घराजवळ आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यांना दोन चोरटे दुचाकीवरून विघ्नहर साखर कारखान्याच्या दिशेने गेल्याचे आढळून आले. या घटनेबाबत जुन्नर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.