नारायणगाव: टोमॅटोचे बाजारभाव वाढल्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी समाधान व्यक्त करीत आहे. सध्या टोमॅटोच्या एका किलोला 40 ते 45 रुपये बाजारभाव मिळत आहे. दरम्यान सध्या थंडी अधिक प्रमाणात असल्यामुळे टोमॅटोची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे.
सध्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये दररोज तीन ते चार हजार क्रेटची टोमॅटोची आवक होत आहे. कमी प्रमाणामध्ये आवक होत असल्याने बाजारभाव चांगलेच वाढले आहेत. वीस किलो टोमॅटोला 850 ते 900 रुपये बाजारभाव मिळत आहे. गावठी टोमॅटोला बाजारभाव याहून अधिक मिळत आहे. संकेत मराठीपेक्षा गावठी टोमॅटोला मागणी जास्त आहे.
जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील उपबाजारामध्ये जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांचे टोमॅटो कमी प्रमाणात विक्रीला येत आहे. येथे आंबेगाव, शिरूर, संगमनेर, अकोले, श्रीगोंदा, बीड, सातारा, सांगली, बारामती या भागातून अधिकची आवक आहे. बाहेरून विक्रिला आलेल्या टोमॅटोची प्रतवारी चांगली असल्याने टोमॅटोला बाजारभाव जास्त मिळत आहे. मॉलसाठी लागणारे टोमॅटोपेक्षा अधिकचा बाजारभाव मिळत आहे. हे बाजारभाव असेच वाढते राहतील, असे बाजार समितीचे संचालक व टोमॅटो व्यापारी सारंग घोलप यांनी सांगितले.
सारंग म्हणाले, हे वाढीव बाजारभाव जानेवारीच्या मध्यापर्यंत टिकून राहतील. त्यानंतर हळूहळू उन्हाळा सुरू झाल्यावर टोमॅटोची आवक वाढेल आणि दर काही प्रमाणात कमी होतील. सध्या थंडीमुळे टोमॅटोची तोडणी चार दिवसांतून एकदा करावी लागते. लहान-मोठ्या एकत्र टोमॅटोला अपेक्षित दर मिळत नाही. तसेच वाद टाळण्यासाठी टोमॅटो विक्रीला आणताना चांगली प्रतवारी करून आणावेत, असे आवाहनही त्यांनी केले.
दरम्यान टोमॅटोला बाजारभाव वाढत असल्यामुळे सध्या टोमॅटो लागवडीवर शेतकऱ्यांचा भर वाढू लागला आहे. हिवरे येथील शेतकरी पांडुरंग भोर म्हणाले, हिवाळ्यामध्ये टोमॅटोचे पीक अधिकच निरोगी असते. औषधांचा खर्च कमी होतो. त्यामुळे शेतकऱ्यांचा पुन्हा टोमॅटो लागवडीकडे कल वाढला आहे. सध्याचे दर टिकले यंदा टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.