नायगाव: पुरंदर उपसा योजना शेतीसिंचनासाठी जीवनवाहिनी ठरत असली, तरी पाण्यावर तरंगणारा तवंग पाहता ही योजना नागरिकांच्या आरोग्यासाठी मात्र धोकादायक ठरत आहे. याबाबत वेळीच योग्य उपाययोजना करणे गरजेचे आहे; अन्यथा ही जीवनवाहिनी नागरिकांच्या जिवावर उठल्याशिवाय राहणार नाही, हे नक्की.
पुरंदरच्या पूर्व भागातील 25पेक्षा अधिक गावे व त्या गावच्या वाड्या-वस्त्या पुरंदर उपसा योजनेच्या लाभक्षेत्रात येतात. शेती आणि पिण्याच्या पाण्याचा खडखडाट असताना नागरिकांचे आरोग्य मात्र तंदुरुस्त होते. पुरंदर उपसा योजना सुरू झाल्यानंतर शेतीत सुधारणा झाली. परिणामी, शेतकऱ्यांना मोठा आर्थिक हातभार लागला आहे. पाण्याची उपलब्धता असल्याने अनेक शेतकऱ्यांनी शेतीसोबत जोडधंदा म्हणून कुक्कुटपालन आणि दुग्धव्यवसाय सुरू केले आहेत. यामुळे शेतकरी प्रगतीच्या वाटेवर आहेत.
दरम्यान, हे पाणी शुद्ध नसल्यामुळे अनेक वर्षे लोटल्यानंतर या भागातील नागरिकांच्या आरोग्यावर देखील तितकेच गंभीर परिणाम दिसू लागले आहेत. मूतखडा, त्वचेचे आजार, श्वसन आणि फुप्फुसाचे आजार देखील जाणवू लागले. कधी नव्हे, ते कॅन्सरसारखा गंभीर आजार या भागातील नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम करू लागला आहे. दूषित पाणी आणि त्यातून तयार होणारे जंतू, कीटकनाशके यांची वाढ झाल्यामुळे अतिविषारी सापांचा देखील अधिवास देखील वाढू लागला आहे.
या कारणांमुळे काही नागरिकांना आपले जीव देखील गमवावे लागले आहेत. त्यामुळे पुरंदर उपसा सिंचन योजना जेवढी शेतीसाठी फायदेशीर ठरली आहे, तेवढीच नागरिकांच्या आरोग्यासाठी परिणामकारक देखील ठरत आहे. शेतीतून निघणारे उत्पन्न आणि भाजीपाले, यावर देखील या पाण्याचे दुष्परिणाम दिसू लागले आहेत. यामुळे भविष्यातील शेतातील उत्पन्न देखील कमी होऊ शकते, असे जाणकारांचे म्हणणे आहे.
शुद्ध पाणी मिळण्यासाठी उपाययोजना कराव्यात
पुरंदर उपसा जलसिंचन योजना पुरंदरसाठी वरदान ठरलेली आहे; मात्र शेतीतील प्रगती आणि नागरिकांचे आरोग्य, या बाबींचा विचार करता योजनेतून पूर्णपणे शुद्ध पाणी सोडणे गरजेचे आहे; अन्यथा आर्थिक प्रगतीसाठी वरदान ठरलेली पुरंदर उपसा योजना नागरिकांच्या आरोग्यासाठी मृतवाहिनी ठरू शकेल, यात तिळमात्र शंका नाही. पुरंदर उपसा योजना सुरूच राहावी; मात्र शासनाने शुद्ध पाणी मिळण्यासाठी योग्य उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग््राामस्थ तसेच शेतकऱ्यांमध्ये होत आहे.