Orange Pudhari
पुणे

Nagpur Orange Production: पावसाच्या खंडाचा नागपूरच्या संत्र्यांना फटका; उत्पादन घटले, पुण्यात आवकही रोडावली

मार्केट यार्डात अवघ्या दोन टेम्पोंमधून ८०० क्रेट संत्री दाखल; १८ किलोच्या क्रेटला ८०० ते १,४०० रुपये दर, यंदा हंगाम लवकर आटोपण्याची शक्यता

पुढारी वृत्तसेवा

पुणे: पावसाचा मोठा खंड आणि पाण्याच्या कमतरतेचा फटका यंदा संत्र्यांच्या उत्पादनाला बसला आहे. पुरेशा पाण्याअभावी संत्र्यांच्या बागांचे योग्य पोषण न झाल्याने उत्पादन घटले असून, फळांच्या आंबट-गोड चवीवरही परिणाम झाला आहे.

अशा परिस्थितीत गुलटेकडी मार्केट यार्डातील फळबाजारात नागपूरच्या संत्र्यांची आवक सुरू झाली आहे. रविवारी (दि. १८) बाजारात अवघ्या दोन टेम्पोंमधून सुमारे ८०० क्रेट संत्री दाखल झाली. दर्जानुसार १८ किलोच्या क्रेटला ८०० ते १ हजार ४०० रुपये दर मिळाला.

नागपूर जिल्ह्यातील बडूर परिसरातून संत्र्यांची आवक होत आहे. दर वर्षी हंगामाच्या सुरुवातीला बाजारात सात ते आठ टेम्पो संत्री दाखल होतात. यंदा मात्र उत्पादन घटल्याने अवघे दोन टेम्पो संत्री बाजारात पोहोचली आहेत.

याबाबत संत्र्यांचे आडतदार सतीश शिंदे यांनी सांगितले, की पावसाच्या कमतरतेमुळे संत्र्यांच्या बागांचे अपेक्षित पोषण झालेले नाही. परिणामी, उत्पादन घटले असून, संत्र्यांच्या चवीवरही परिणाम झाला आहे.

रविवारी आमच्याकडे १३३ क्रेट, तर संपूर्ण बाजारात सुमारे ८०० क्रेट संत्र्यांची आवक झाली. सध्या किलोला ४० ते ८० रुपयांपर्यंत दर मिळत आहे. दर वर्षी संत्र्यांचा हंगाम तीन ते चार महिने म्हणजेच फेब्रुवारीपर्यंत चालतो. मात्र, यंदा उत्पादन घटल्याने हा हंगाम अवघ्या दोन ते तीन महिन्यांत आटोपण्याची शक्यता असल्याचेही शिंदे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT