पुणे: आपल्या लाडक्या बाप्पाचे आज जल्लोषात आगमन होणार असून, उत्सवाच्या पहिल्या दिवशी श्री गणेशमूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेसाठी सध्या गुरुजी ‘ऑन डिमांड’ आहेत. एका गुरुजीकडून आजच्या दिवशी 15 ते 20 पूजा करण्यात येणार आहेत आणि त्यात घरगुती गणपतींच्या पूजेची संख्या सर्वाधिक आहे, तर विशेष म्हणजे काही गुरुजी भारतातून थेट ऑनलाइन माध्यमाद्वारे परदेशात राहणार्या मराठीभाषकांच्या घरी सर्व विधी पूर्ण करून बाप्पा विराजमान होणार आहे.
इतकेच नव्हे तर गणेशोत्सवाच्या दहाही दिवस गुरुजींच्या तारखा फुल्ल झाल्या आहेत. धार्मिक उपक्रमांसाठी पुण्यातील गुरुजी विविध जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत. (Latest Pune News)
बुधवारपासून (दि. 27) गणेशोत्सवाच्या आनंदपर्वाला सुरुवात होत आहे. पहिल्या दिवशी ‘श्रीं’ची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठीची पूजा गुरुजींकडून केली जाते. त्यामुळे पहिल्या दिवशी प्रत्येक गुरुजी किमान 15 ते 20 ठिकाणी पूजेसाठी जाणार आहेत. घरगुती गणपतीसह मंडळांकडून धार्मिक उपक्रमांसाठी गुरुजींना बोलावण्यात आले आहे.
एका घरगुती गणपतीच्या पूजेसाठी गुरुजी एक ते दोन हजार रुपयांपर्यंतची दक्षिणा घेणार आहेत, तर मंडळांकडून तीन ते चार हजार रुपये दक्षिणा घेण्यात येणार आहेत. परदेशात राहणार्या मराठीभाषकांच्या श्री गणेशमूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेची पूजा ऑनलाइन पद्धतीने सांगणार आहेत.
तर उत्सवातील दहा दिवसांसाठी गौरी आवाहन, श्री गणेशयाग, सत्यनारायण पूजा, होमहवन आदी धार्मिक उपक्रमांसाठीही गुरुजींच्या तारखा बुक झाल्या आहेत. पुण्यातील काही गुरुजी मुंबई, नाशिक, कोल्हापूर, सातारा, सांगली, कोकण विभाग आदी ठिकाणचा दौराही करणार आहेत.
गुरुजी अनुपम कुलकर्णी म्हणाले, उत्सवाच्या धार्मिक उपक्रमांसाठी एक महिनाआधीपासूनच विचारणा सुरू झाली आणि उत्सवाच्या दहाही दिवसांत श्री गणेशयाग, अथर्वशीर्ष पठण, सत्यनारायण पूजा अशा धार्मिक उपक्रमांसाठी तारखा बुक झाल्या आहेत. उत्सवातील पहिल्या दिवशी 10 ते 15 श्री गणेशमूर्तींच्या प्राणप्रतिष्ठेसाठीची पूजा करणार आहे.