

पुणे: साईलीला दीपावली हा श्रीसाई बाबा यांच्यावरील देखावा असो वा नरसिंह अवतार हा पौराणिक देखावा... भारत- पाकिस्तान युद्धाचा थरार असो वा श्रद्धा असावी; पण अंधश्रद्धा नसावी... या देखाव्यातून अंधश्रद्धेविरोधात केलेले समाजप्रबोधन... असे ऐतिहासिक, पौराणिक आणि सामाजिक विषयांवरील जिवंत देखावे सादर करणारे मंडळ म्हणजे भवानी पेठेतील श्री शिवाजी मित्रमंडळ ट्रस्ट... शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या या मंडळाने जिवंत देखाव्यांची एक परंपरा जोपासली असून, मंडळाला जिवंत देखाव्यांच्या सादरीकरणासाठी विविध पुरस्कारही मिळाले आहेत. फक्त देखाव्यांमधूनच नव्हे, तर वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांमधून मंडळाने सामाजिक बांधिलकीचा वसा जपला आहे. (Latest Pune News)
सामाजिक उपक्रम, गणेशोत्सवात सामाजिक विषयांवरील जिवंत देखावे अन् गरजूंना मदतीचा हात... असे अनेक उपक्रम मंडळाकडून राबविले जात असून, त्यात असलेला कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग वाखाणण्याजोगा आहे. गणेशोत्सवात डीजे न वाजता मिरवणूक काढण्यासह वैविध्यपूर्ण धार्मिक उपक्रमांमधून उत्सवातील पारंपरिकताही जपली जात असून, मंडळाने आपल्या कामातून वेगळी ओळख निर्माण केली आहे.
मंडळाच्या कार्यकर्त्यांनी उत्सव काळात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनावर आधारित देखावा, ध्यास शिवशाहीचा, भारत माता, सैनिक हो तुमच्यासाठी अशा विविध विषयांवरील जिवंत देखावे साकारले असून, श्रीगणेश भक्तांचा या देखाव्यांना प्रतिसादही मिळत आहे. जिवंत देखाव्यांसाठी मंडळाला गणेशोत्सव स्पर्धांमध्ये पुरस्काराने गौरविले आहे. यंदाही सामाजिक विषयावरील देखावा सादर केला जाणार असून, देखाव्याची तयारी पूर्ण झाली आहे.
मंडळाकडून राबविण्यात येणारे विविध उपक्रम
विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप प गरजूंना धान्यवाटप प रक्तदान आणि आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन प घरोघरी जाऊन मुलांना पुस्तकांचे वाटप
राष्ट्रीय सण साजरे करणे प महापुरुषांच्या जयंती साजरी करणे
कातकरींसोबत दिवाळी साजरी करणे
आम्ही कार्यकर्ते उत्सवाच्या काही दिवस आधी एकत्र येऊन देखाव्यासाठीचा विषय ठरवतो. त्यानंतर संहिता, देखाव्याची मांडणी याबद्दल चर्चा होते आणि देखाव्यासाठीचे काम एका संस्थेला दिले जाते. गणेशोत्सवात देखावे पाहायला येणार्या श्रीगणेश भक्तांसमोर कलाकार देखावा सादर करतात आणि देखाव्याला त्यांची उत्स्फूर्त दाद मिळते. खासकरून सामाजिक विषयांवरील प्रबोधनात्मक देखावे सादर करून आम्ही सामाजिक संदेश रुजविण्याचा प्रयत्न करत आहोत. सामाजिक उपक्रमात कार्यकर्त्यांचा उत्साही सहभाग असतो. उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यावर आमचा भर असतो. तसेच, मंडळाकडून मुस्लिम समाजबांधवांसाठीही विविध उपक्रम आयोजित केले जात आहेत.
प्रल्हाद थोरात, अध्यक्ष, श्री शिवाजी मित्र मंडळ ट्रस्ट (भवानी पेठ)