पुणे

माझी आई माझ्याबरोबर; तिचा मला आशीर्वाद : उपमुख्यमंत्री अजित पवारांचे मतदानानंतर वक्तव्य

Laxman Dhenge

भवानीनगर : पुढारी वृत्तसेवा : या निवडणुकीमध्ये माझी आई माझ्याबरोबर नाही, असा आरोप केला जात होता परंतु यामध्ये काहीही तथ्य नाही. त्या खासगी कार्यक्रमासाठी नातेवाइकांकडे गेलेल्या होत्या, त्या सहयोगवर आल्या असून मी तुझ्याबरोबर मतदानाला येणार आहे, असे म्हणाल्या. मग सहयोगवरून मी, सुनेत्रा आणि आई मतदानाला आलो आहे. आईचा मला आशीर्वाद आहे, पाठिंबा आहे. शेवटी ती माझी आई आहे, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काटेवाडी येथे व्यक्त केले.

अजित पवार यांनी काटेवाडी येथील मतदान केंद्रावर आई आशादेवी पवार, महायुतीच्या उमेदवार व पत्नी सुनेत्रा पवार यांच्यासह मतदान केले. या वेळी पवार म्हणाले, देशाचे भवितव्य ठरवणारी व उद्याच्या पाच वर्षांत देश कोणाच्या हातामध्ये देणार याची ही महत्त्वाची निवडणूक आहे, या अँगलने बघा हे मी शेवटपर्यंत सांगत होतो. प्रत्येक उमेदवाराच्या प्रचारासाठी कार्यकर्ते काम करतात, त्यांना वाटते आपलाच उमेदवार निवडून येणार आहे परंतु मतदार आमच्या उमेदवाराच्या मागे आहेत हे दिसून येईल. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी ही निवडणूक आहे.

या निवडणुकीमध्ये संपूर्ण परिवार माझ्या विरोधात नव्हता, आमचा परिवार इतका मोठा आहे केवळ शरद पवार यांची फॅमिली, श्रीनिवास पवार यांची फॅमिली व राजेंद्र पवार यांची फॅमिली यांच्याव्यतिरिक्त कोणीही माझ्या विरोधात नव्हते. प्रत्येकाला आपापल्या पद्धतीने मते मागण्याचा अधिकार आहे, त्यांनी मुलाखती दिल्या, प्रचार करताना भाषणे कशी केली हे तुम्ही बघितले. ध्येय नाही, धोरण नाही, काहीही नाही. आपला प्रचार करायचा म्हणून करायचा, त्या भाषणांना मी काही महत्त्व देत नाही, ज्यावेळी विधानसभेची निवडणूक लागेल त्यावेळी कोण कुठे प्रचार करतोय हे महाराष्ट्र पाहील.

पैसे वाटपाच्या आरोपावरून अजित पवार म्हणाले, यात काहीही तथ्य नाही. त्यांचाच माणूस पाठवतील व म्हणतील तू असे म्हण, निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीत आरोप- प्रत्यारोप झाले, मी त्याला जास्त महत्त्व दिले नाही. मी पहिल्यापासूनच ठरवले होते विकासाला महत्त्व द्यायचं, सांगता सभेला बारामतीकरांनी प्रचंड प्रतिसाद दिला. मोदींनी दहा वर्षांत केलेल्या कामांमुळे महायुतीच्या उमेदवारांना मतदान होणार आहे. बारामतीच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र व राज्याचा निधी मिळावा, मतदारांनी मला नेहमीच साथ दिलेली आहे. या निवडणुकीतही मतदार मला साथ देतील, असा मला पूर्ण विश्वास आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT