पुणे: महापालिका निवडणुकीत काही पक्षांनी थेट गुन्हेगारांच्या कुटुंबीयांना उमेदवारी दिली आहे. पालकमंत्री म्हणतात, शहरातील गुन्हेगारी संपली पाहिजे. मात्र, त्यांची उमेदवारी यादी पाहिली तर ती कोणत्या तत्त्वात हे बसते, त्यांनीच सांगावे. गुन्हेगारांना राजकारणात स्थान नसावे. दुसऱ्या पक्षाने गुन्हेगारांना उमेदवारी दिली. परंतु आम्ही दिली नाही. पुणेकर पाहत आहेत की, नेमकी कोणाला उमेदवारी दिली गेली आहे. मतपेटीमधून त्याचे उत्तर मतदार देतील, असे म्हणत केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी अप्रत्यक्षरीत्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाना साधला.
पुणे शहर भाजप माध्यम कक्षाचे उद्घाटन केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील आणि महाराष्ट्र प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ता केशव उपाध्ये यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी माजी मंत्री दिलीप कांबळे, भाजप प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, आमदार योगेश टिळेकर, माजी आमदार जगदीश मुळीक, भाजप प्रवक्ते संदीप खर्डेकर आदी उपस्थित होते. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्री व पुणे महापालिका निवडणूकप्रमुख मोहोळ बोलत होते.
भाजपने गुन्हेगारांना उमेदवारी दिली या प्रश्नावर उत्तर देतांना मोहोळ म्हणाले, गुन्हेगारांना व त्यांच्या कुटुंबीयांना आम्ही उमेदवारी देण्याबाबत सकारात्मक नाही. वार्ड क्रमांक 38 मध्ये रोहिदास चोरघे यांच्या पत्नी प्रतिभा चोरघे या अनेक वर्षे सामाजिक काम करत आहेत. त्यामुळे त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. चोरघे यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी मला माहिती नाही. या निवडणुकीत भाजपने केलेली विकासकामे हा मुद्दा घेऊन आम्ही जनतेसमोर जाणार आहोत. मोहोळ म्हणाले, केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून नागरिकहिताची अनेक विकासकामे शहरात झाली. मेट्रोचा विस्तार, सार्वजनिक वाहतूक सक्षम करणेसाठी अधिक इ बसेस, समान पाणीपुरवठा, वैद्यकीय महाविद्यालय, नवे विमानतळ टर्मिनल, चांदणी चौक विस्तारीकरण आदी विकासकामे भाजपच्या काळात झाली आहेत. पुणेकर सुज्ञ असून, ते विकास कामांना प्राधान्य देतात. पुण्याला विकासाच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. त्यामुळे आम्ही पूर्ण ताकदीने मनपा निवडणूक लढत आहोत. त्यामुळे पुण्याचा महापौर पुन्हा भाजपाचाच होईल, असा विश्वास देखील मोहोळ यांनी व्यक्त केला.
92 महिलांना व तरुणांना दिली उमेदवारी
आरक्षणाप्रमाणे 83 महिलांना उमेदवारी देणे अपेक्षित होते. मात्र, आम्ही 92 महिला उमेदवारांना उमेदवारी देण्यास प्राधान्य दिले आहे. एवढेच नाही तर उमेदवारी देणाऱ्या उमेदवारांचे वय हे 24 ते 40 वयोगटातील असून, सर्वाधिक तरुणांना आम्ही संधी दिल्याचे मोहोळ यांनी स्पष्ट केले. युतीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे निर्णय घेतील भाजप, शिवसेना आणि आरपीआय यांची निवडणुकीत युती आहे. भाजप आणि शिवसेना या पक्षांनी ठराविक जागेपेक्षा एबी फॉर्म अधिक उमेदवार यांना दिले आहे. युती टिकली पाहिजे, अशी सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे. त्यानुसार प्रयत्न सुरू आहेत.
भाजपचे 105 नगरसेवक मागील निवडणुकीत होते, असे असताना आम्ही युतीची तयारी दाखवली. शिवसेनेच्या कमी जागा असतानाही ते ठराविक संख्येपेक्षा अधिक जागा मागत होते. उमेदवारीबाबत मतमतांतर होते. स्थानिक पातळीवर एकमत झाले नाही म्हणून हा प्रश्न वरिष्ठ पातळीवर गेला आहे. मात्र, आता याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे करणार आहे. आरपीआयला आम्ही 8 जागा, तर शिवसेनेला 16 जागा द्यायला तयार होतो. असे असताना शिवसेने 150 एबी फॉर्म का दिले हा प्रश्न आहे, असे मोहोळ यांनी यावेळी सांगितले.