पुणे

Crime news : हॉटेल कामगाराचा खून; दोघांना अटक

अमृता चौगुले

शिरूर : पुढारी वृत्तसेवा :  पुणे ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने हॉटेल कामगाराच्या खुनाचा छडा लावत आरोपींना गजाआड करण्यात यश मिळविले. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत भीमा नदीपात्रात पारगाव पुलाजवळ अनोळखी मृतदेह आढळला होता. मृतदेहाची पाहणी केली असता, त्याचा खून झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे याबाबत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. शिरूर पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेचे पथक या प्रकरणी समांतर तपास करीत होते. ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने कसोशीने तपास करीत तांत्रिक विश्लेषण व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर संशयित वाहन पिकअप सुपा टोलनाका बाजूने गेल्याचे निदर्शनास आल्याने तपास सुरू ठेवला. मयत संतोष गाडेकर (रा. टोकवाडी, ता. मंठा, जि. जालना) हा हॉटेल सौंदर्या इन हा येथे कामास होता, अशी माहिती मिळाली.

पोलिसांनी बापू भीमाजी तरटे (रा. पळवे खुर्द, ता. पारनेर), नीलेश माणिक थोरात (रा. मुंगशी, ता. पारनेर) यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. संतोष याने हॉटेल काम करणेसाठी आगाऊ रक्कम घेतली होती. परंतु, तो काम करीत नसल्याने त्यास मारहाण करून त्याचा खून करण्यात आला. त्याचा मृतदेह पिकअप वाहनातून पारगाव पुलावरून भीमा नदीपात्रात टाकण्यात आला.

ही कारवाई ग्रामीण गुन्हे शाखेचे प्रमुख पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक गणेश जगदाळे, सहायक पोलिस निरीक्षक संदीप यादव, स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक फौजदार तुषार पांदारे, हवालदार जनार्दन शेळके, राजू मोमीन, मंगेश थिगळे यांच्या पथकाने केली.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT