पुणे: महापालिकेच्या सुरक्षा विभागावर वाढत्या जबाबदार्या असतानाही हा विभाग गंभीर समस्यांनी ग्रासलेला आहे. कायमस्वरूपी पदांची मोठी तूट, जुनी जीर्ण झालेली शस्त्रास्त्रे, वाहने आणि वॉकीटॉकीसारख्या मूलभूत साधनांचा अभाव अशा परिस्थितीत महापालिकेचे सुरक्षारक्षक काम करत आहेत. त्यामुळे सुरक्षा विभागाने महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे.
महापालिकेत सुरक्षा रक्षकांची एकूण 666 कायम पदे मंजूर आहेत. मात्र त्यापैकी फक्त 275 रक्षक कार्यरत असून तब्बल 391 पदे रिक्त आहेत. कंत्राटी स्वरूपातील 1565 पदे निविदा प्रक्रियेतून खाजगी ठेकेदारामार्फत भरण्यात येतात. यामध्ये 25 तृतीयपंथी सुरक्षा रक्षकांचाही समावेश आहे. परिणामी, सुरक्षा विभागातील स्थैर्य आणि शिस्त ढासळलेली दिसते. (Latest Pune News)
महापालिकेच्या विविध इमारती, शाळा, आरोग्य केंद्रे, सांस्कृतिक केंद्रे, क्रीडांगणे, जलकेंद्रे, उद्याने, स्मशानभूमी, वसतिगृह आदी ठिकाणांच्या सुरक्षेची जबाबदारी हा विभाग सांभाळतो. मात्र, विभागाकडे आजही सिंगल बोर व डबल बोरच्या 22 बंदुका आणि
फक्त 2 पिस्तुले असून तीही कालबाह्य आहेत.
त्याशिवाय, विभागाकडे स्वतंत्र वाहने नाहीत, वॉकीटॉकी नाहीत, तपासणीसाठी आवश्यक साधने नाहीत. अगदी सुरक्षा रक्षकांच्या खाकी गणवेशालाही अधिकृत मान्यता आहे की नाही, याबाबतही संभ्रम आहे. याशिवाय रिक्त पदांची भरती, नवे शस्त्र, गणवेशास मान्यता, वॉकीटॉकी, तपासणी साहित्य आणि स्वतंत्र दोन वाहने देण्याची मागणी सुरक्षा अधिकारी राकेश विटकर यांनी केली असून या बाबतचे पत्र आयुक्त नवल किशोर राम यांना देण्यात आले आहे.
सुरक्षा रक्षकांच्या ‘या’ आहेत मागण्या
शाळांसाठी हवे 200 सुरक्षारक्षक
मुलींच्या बससाठी हवे 60 सुरक्षारक्षक
प्राणिसंग्रहालय व उद्यानांसाठी हवे 400 सुरक्षारक्षक
पाणीपुरवठा विभागासाठी हवे 150 सुरक्षारक्षक
सांस्कृतिक विभागासाठी हवे 70 सुरक्षारक्षक
मालमत्ता व्यवस्थापनासाठी हवे 100 सुरक्षारक्षक