पुणे

Pmc School : पालिकेच्या शाळेत टाकलं हेच आमचं चुकलं का?

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : 'आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने शुक्रवार पेठेतील महापालिकेच्या सरदार कान्होजी आंग्रे इंग्रजी माध्यमिक विद्यालयात मुलीला पाठविण्याचा निर्णय घेतला. पालिकेकडून मिळणार्‍या अन्य गोष्टींपेक्षा शिक्षणालाच आमचे प्राधान्य होते. सद्य:स्थितीत सत्र परीक्षा तोंडावर आलेली असताना शाळेतील कंत्राटी शिक्षकांनी जोपर्यंत वेतन होणार नाही तोपर्यंत शाळेवर रुजू न होण्याचा निर्णय घेतला आहे. प्रशासनाने शिक्षकांवर ही वेळ आणल्याने मुलीचे नुकसान होण्याची शक्यता आहे. मुलीच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आम्ही मुलीला पालिकेच्या शाळेत टाकलं हे आमचं चुकलं का?' असा उद्विग्न सवाल केला आहे राष्ट्रभूषण चौक परिसरात राहणार्‍या सुरेखा जुजगार यांनी. त्यांची मुलगी सरदार आंग्रे विद्यालयात सातवीच्या वर्गात शिकते.

पुणे शहरातील महापालिकेच्या इंग्रजी माध्यमाच्या जवळपास 54 प्राथमिक शाळांमधील कंत्राटी शिक्षकांनी चार महिन्यापासून वेतन थकविल्याने 166 शिक्षकांनी जोपर्यंत वेतन होणार नाही, तोपर्यंत शाळेवर रुजू न होण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी, मागील चार दिवसांपासून शाळेत निम्म्या स्वरूपात उपलब्ध असलेल्या कायमस्वरूपी शिक्षकांवर या शाळा सुरू आहेत. परीक्षांचा कालावधी जवळ येत असतानाचा शिक्षकांनी कामावर रुजू न होण्याचा पवित्रा घेतल्याने पालकांचे धाबे दणाणले आहे. प्रशासनाने त्यांनी केलेल्या कामाचे वेतन वेळेत दिले असते, तर शिक्षकांवर ही वेळ आली नसती आणि विद्यार्थ्यांचे नुकसानही टळले असते, अशी भावना व्यक्त करत पालक वर्गामध्ये प्रशासनाविरोधात नाराजीचा सूर उमटत आहे.

येरवडा परिसरात राहणार्‍या समृध्दी नवगिरे म्हणाल्या, विद्या निकेतन इंग्रजी माध्यमाच्या शाळा क्र. 6 मध्ये माझी मुलगी तिसरीमध्ये शिकत आहे. मी गृहिणी असून माझे पती खासगी नोकरी करतात. पालिकेच्या शाळांमध्येही दर्जेदार शिक्षण उपलब्ध झाल्याने मुलीला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत टाकले. मात्र, सद्य:स्थितीत वेतनाअभावी शिक्षक कामावर रुजू होत नसल्याने शिक्षकच नसल्याची स्थिती आहे.

परीक्षेच्या तोंडावर असा प्रकार घडायला नको होता. तर, लोहियानगर परिसरात राहणारे अश्फाक अन्सारी हे गॅरेजमध्ये काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांच्या दोन मुली या सरदार कान्होजी आंग्रे इंग्रजी माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेत आहेत. प्रशासनाने किमान शिक्षणाचे गांभीर्य ओळखून ही परिस्थिती निर्माण होणार नाही याची खबरदारी घेणे आवश्यक होते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केल्याने ही वेळ आली. आता तरी प्रशासनाने तत्काळ शिक्षकांचे वेतन जमा करून त्यांना कामावर रुजू करून घ्यावे अशी मागणी त्यांनी केली आहे.

शहरातील महापालिकेच्या शाळांची स्थिती

  • इंग्रजी माध्यमाच्या शाळा-52
  • शिक्षकांची मंजूर पदे-580
  • कायमस्वरूपी शिक्षकांची भरती-300
  • कंत्राटी पद्धतीने रुजू शिक्षक-166

मागील वर्षीची अनामत रक्कम व चालू वर्षांतील मागील चार महिन्यांचे वेतन न मिळाल्याने कंत्राटी शिक्षकांनी जोपर्यंत वेतन होणार नाही तोपर्यंत शाळेवर रुजू न होण्याचा निर्णय घेत त्याबाबतचे पत्र मुख्याध्यापकांकडे सुपुर्त केले आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान करण्याचा कोणताही हेतू नाही. मात्र, शिक्षकांनाही कुटुंब आहे, त्यांचाही उदरनिर्वाह होणे गरजेचे असून, केलेल्या कामाचा मोबदला मिळणे हा त्यांचा अधिकार आहे. जोपर्यंत वेतनाची रक्कम हातात पडत नाही तोपर्यंत कामावर रुजू होणार नाही.

– प्रवीण खेडकर, कंत्राटी शिक्षक

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT