पालिकेची रुग्णालयेच सलाईनवर; रिक्त पदांमुळे रुग्णसेवेला फटका Pudhari
पुणे

Municipal Hospital Staff Shortage: पालिकेची रुग्णालयेच सलाईनवर; रिक्त पदांमुळे रुग्णसेवेला फटका

वर्ग 1 ते 4 मधील तब्बल 635 पदे रिक्त

पुढारी वृत्तसेवा

municipal hospitals suffer due to vacant posts

पुणे: महापालिकेच्या आरोग्य विभागात तसेच रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाचा अभाव असल्याचे समोर आले आहे. मंजूर पदे असूनही मोठ्या संख्येने पदे रिक्त असल्याने त्याचा थेट परिणाम रुग्ण सेवेवर होत आहे. ताज्या आकडेवारीनुसार वर्ग 1 ते 4 मधील तब्बल 635 पदे अद्याप भरली गेलेली नाहीत.

महापालिकेकडे एकूण 1,783 पदे मंजूर आहेत. त्यापैकी केवळ 1,160 पदांवर कर्मचारी कार्यरत असून, उर्वरित 635 पदे रिक्त आहेत. वर्ग 1 मध्ये 145 पदांपैकी फक्त 39 पदांवर अधिकारी कार्यरत असून, तब्बल 106 पदे रिक्त आहेत. ही परिस्थिती वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, विशेषज्ञ डॉक्टर यांच्याबाबत गंभीर ठरत आहे. (Latest Pune News)

वर्ग 2 मध्ये 268 पदे मंजूर असताना 183 पदे कार्यरत आहेत, मात्र 85 पदे रिक्त आहेत. वर्ग 3 मध्ये परिचारिका, तंत्रज्ञ, आरोग्य सहाय्यक यांसारख्या 755 पदांपैकी 534 पदे कार्यरत असून, 221 पदे अद्याप रिक्त आहेत. वर्ग 4 मध्ये सफाई कामगार, परिचारिका अशा 615 पदांपैकी 404 कार्यरत असून, 223 पदे रिक्त आहेत.

महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये रोज मोठ्या प्रमाणावर रुग्णांची गर्दी होत असते. मात्र, तज्ज्ञ डॉक्टर, परिचारिका व इतर सहाय्यक कर्मचारी अपुऱ्या संख्येने उपलब्ध असल्याने रुग्णांना अपेक्षित सेवा मिळण्यात अडचणी येतात. विशेषतः परिचारिका व सफाई कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे रुग्णालयातील दैनंदिन कामकाजावर परिणाम होत आहे.

आरोग्य क्षेत्रात वाढती आजारांची प्रकरणे, मोफत उपचारासाठी होणारी गर्दी आणि सार्वजनिक आरोग्य मोहिमा यामुळे अतिरिक्त मनुष्यबळाची गरज आहे. मात्र, पदभरती प्रक्रियेला वेग न मिळाल्याने महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेला अडथळे निर्माण होत आहेत. तातडीने रिक्त पदे भरण्याची मागणी रुग्णसेवेशी संबंधित कर्मचारी व सामाजिक संघटनांकडून जोर धरू लागली आहे.

विविध वर्गांमधील रिक्त पदे भरण्यासाठी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. काही पदांसाठी भरती प्रक्रिया, तर काही पदांसाठी वॉक इन सुरू झाले आहे. याबाबत सामान्य प्रशासन विभागाला प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.
- डॉ. नीना बोराडे, आरोग्यप्रमुख, पुणे महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT