पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : गाळा, पत्राशेडच्या बाजूस किंवा शेजारी राहणारे व्यावसायिक, कुटुंबीय तसेच, कर्मचारी अशा पत्राशेड व गाळ्याची संख्या पिंपरी-चिंचवड शहरात मोठी आहे. अशा हार्डवेअर, स्वीट मार्ट, बेकरी, हॉटेल, गोदाम, नर्सरी, भंगार, गॅरेज, खाद्यपदार्थ विक्रीची दुकाने तसेच, इतर आस्थापना व दुकानांची तपासणी महापालिका करणार आहे. तसेच, अग्निशमन यंत्रणेची सुविधा आहे की नाही, यांचीही पाहणी केली जाणार आहे, असे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांनी बुधवारी (दि.30) सांगितले.
पूर्णानगर, चिखली येथील एका हार्डवेअरच्या दुकानास आग लागून दुकानदारांसह त्यांच्या तीन कुटुंबियांचा दुर्देवी मृत्यू झाला. ते दुकान असलेल्या गाळ्याच्या वरील बाजूस राहत होते. दुकानातील ज्वालीग्राही पदार्थामुळे आग वाढल्याचे अग्निशमन विभागाचा अंदाज आहे. दुकानाच्या शटरला बाहेरच्या बाजूने टाळे असल्याने मदत कार्यास विलंब झाल्याचे अग्निशमन विभागाने सांगितले.
व्यावसायिक ठिकाणी दाटीवाटीने व धोकादायकरित्या राहत असल्याने अशा प्रकाराची दुर्घटना झाल्यास वित्त तसेच, जिवीत हानी होते. असे प्रकार टाळण्यासाठी शहरात व्यावसायिक गाळे व पत्राशेडची पाहणी केली जाणार आहे. व्यावसायिक गाळे, दुकाने, पत्राशेड, बांधकाम साईट, आस्थापनांमध्येच राहत असलेल्या ठिकाणीची पाहणी करून यादी केली जाणार आहे. त्या ठिकाणी अग्निशमन यंत्रणा व साहित्याची व्यवस्था आहे किंवा नाही तपासले जाईल. या करीता अग्निशमन विभागाची एक समिती स्थापन करण्यात येणार आहे. नियमाचे पालन न करणार्या आस्थापना, दुकाने व पत्राशेडवर महापालिकेकडून कारवाई केली जाईल, असे प्रदीप जांभळे यांनी सांगितले.
शहरात सध्या 8 अग्निशमन केंद्र आहेत. शहराच्या लोकसंख्येनुसार शहरभरात अग्निशमन दलाची एकूण 10 नवीन उपकेंद्र सुरू करण्यात येत आहेत. त्यात वाकड, प्राधिकरण-निगडी येथील डॉ. हेडगेवार भवन, सांगवी, कुदळवाडी येथे केंद्र उभारण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यासाठी अग्निशमन बंब, साहित्य व यंत्रसामुग्री उपलब्ध करून देण्यात येत आहे. तसेच, विभागासाठी 180 मनुष्यबळ नव्याने नेमण्यात आले आहे. तसा प्रस्ताव सामान्य प्रशासन विभागाने तयार केला आहे. अग्निशमन विभाग अधिक सज्ज व बळकट झाल्याने शहरातील कोणत्याही भागात दुर्घटना घडल्यास काही मिनिटात त्या ठिकाणी जवान पोहचतील, असे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांनी सांगितले.
हेही वाचा