Pune Government Land Scam Pudhari
पुणे

Mundhwa Land Scam: मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात शीतल तेजवानीविरोधात 1,886 पानी आरोपपत्र दाखल

घोटाळ्याची सूत्रधार असल्याचा आरोप; इतर आरोपींविरोधातही लवकरच आरोपपत्र दाखल होणार

पुढारी वृत्तसेवा

Sheetal Tejwani Mundhwa Land Scam

पुणे: मुंढवा येथील कोट्यवधीच्या जमीन गैरव्यवहार प्रकरणात शीतल तेजवानीविरोधात तब्बल 1 हजार 886 पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणात शीतल तेजवानीसह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इतरांविरोधात लवकरच आरोपत्र दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.

घोटाळा प्रकरणात शीतल सूत्रधार असल्याचेही समोर आल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. पार्थ पवार संचालक असलेल्या अमेडिया कंपनी, संचालक दिग्विजय पाटील, शीतल तेजवानी, तहसीलदार सूर्यकांत येवले, हेमंत गवंडे यांच्यावर बोपोडी व मुंढवा अशा दोन जमीन प्रकरणात पुण्यातील खडक पोलिसांत एकच गुन्हा नोंद झाला. सध्याच्या परिस्थितीत गुन्ह्याचा तपास पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे.

मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणाच्या अनुषंगाने दिग्विजय पाटील, शीतल तेजवानी, हेमंत गवंडे यांना नोटीस देऊन त्यांची चौकशी करण्यात आली होती. हेमंत गवंडे चौकशीला हजर राहिले. नंतर शीतल तेजवानी हिच्याकडे दोन दिवस सलग चौकशी झाली. तिच्याकडील कागदपत्रे जप्त करण्यात आली. त्याचवेळी महार वतनाचे वारसदार असलेल्या व्यक्तींचेही जबाब नोंदविण्यात आले. त्यानुसार पोलिसांनी चौकशी सुरू केली होती.

इतरांविरोधातही लवकरच आरोपपत्र

दिग्विजय पाटील यांच्यासह इतर आरोपींविरोधात पुरावे गोळा करण्याचे काम सुरू असून त्यांच्या विरोधातही आरोपत्र दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.

दमानिया यांची संतप्त प्रतिक्रिया

मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी आरोपपत्रातून पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील यांची नावे वगळण्यात आल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी संताप व्यक्त केला आहे. हे प्रकरण गुंडाळण्याचा विचार यातून दिसतो, अशी पोस्ट त्यांनी सोशल मीडियावर टाकली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT