Mumbai Pune Expressway Missing Link Pudhari
पुणे

Mumbai Pune Missing Link: मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर १ नोव्हेंबरपासून मालवाहू वाहनांना बंदी

धोकादायक पदार्थ वाहून नेणाऱ्या वाहनांनाही प्रवेश नाही; कारसाठी १००, प्रवासी बससाठी ८० किमी प्रतितास वेगमर्यादा

पुढारी वृत्तसेवा

लोणावळा: मुंबई-पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंक (कनेक्टिंग लिंक) मार्गावर सुरक्षित वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य वाहतूक विभागाने १ नोव्हेंबरपासून मालवाहू वाहने आणि ज्वलनशील, स्फोटक किंवा इतर धोकादायक पदार्थांची वाहतूक करणाऱ्या वाहनांना मिसिंग लिंकवरून जाण्यास सक्त मनाई केली आहे. या वाहनचालकांनी मिसिंग लिंककडे न जाता जुन्या द्रुतगती महामार्गाचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

मिसिंग लिंक मार्गावर सुरक्षित वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य वाहतूक विभागाने कठोर पावले उचलली आहेत. अप्पर पोलिस महासंचालक (वाहतूक) प्रवीण साळुंके यांनी या मार्गासाठी एक नवीन आणि कायमस्वरूपी वाहतूक अधिसूचना जारी केली असून, हे नियम १ नोव्हेंबरपासून लागू होणार आहेत. बोगद्यांची रचना, तांत्रिक बाबी आणि प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.

नवीन नियमांनुसार खासगी कार, जीप आणि इतर बिगर-वाहतूक हलकी मोटार वाहने यांना या मार्गावरून प्रवास करता येईल. तसेच, सर्व प्रकारच्या प्रवासी बसेस आणि इतर प्रवासी वाहनांनाही या मार्गाचा वापर करण्याची परवानगी असेल, तर सर्व प्रकारचे मालवाहू वाहने यात पिकअप व्हॅन, टाटा एस आणि ज्वलनशील, स्फोटक किंवा इतर धोकादायक पदार्थांची वाहतूक करणाऱ्या वाहनांना मिसिंग लिंकवरून जाण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.

कार व हलकी वाहनांसाठी १०० कि.मी. तास वेग मर्यादा

प्रतिबंधित असणाऱ्या सर्व मालवाहू व अवजड वाहनांनी नेहमीप्रमाणे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाच्या जुन्या/मूळ मार्गिकेचा वापर करणे बंधनकारक राहील. बोगद्यांमधील सुरक्षिततेसाठी वाहनांच्या प्रकारानुसार कमाल वेगमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये खासगी कार व हलकी मोटार वाहने १०० कि.मी. तास तर प्रवासी बसेस व इतर प्रवासी वाहने यांना ८० कि.मी. तास वेग मर्यादा निश्चित करण्यात आले आहे.

नियमांचे पालन करण्याचे आवाहन

मालवाहू आणि धोकादायक पदार्थांची वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांनी या मार्गाकडे न जाता जुन्या द्रुतगती महामार्गाचाच वापर करावा, प्रशासनाने दिलेली वेगमर्यादा पाळावी आणि रस्त्यावरील वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती महामार्ग पोलिसांनी दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT