पुणे

मुंबई, पुणे बाजार समितीची तपासणी होणारच : पणनमंत्री अब्दुल सत्तार

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : मुंबई आणि पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या कामकाजाच्या तपासणीचे कामकाज गुंडाळण्यात आलेले नाही. तपासणी सुरू असून, चुका करणार्‍यांवर कारवाई होईल. त्यामुळे संंबंधित संचालकांना वाचविण्याचा प्रश्नच येत नाही. पुणे बाजार समितीबाबत मुलाणी समितीच्या अहवालातील निर्णयाची अंमलबजावणी न करणार्‍या संबंधित अधिकार्‍यांवर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा पणनमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिला आहे.

पणन मंडळाच्या मिलेट महोत्सवाच्या उद्घाटनानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. पणन संचालकांच्या आदेशानुसार राज्यातील महत्त्वाच्या असलेल्या या समित्यांच्या कामकाजाची तपासणी सध्या सुरू आहे. 19 ऑक्टोबरच्या आदेशान्वये दिनांक 1 एप्रिल 2019 ते 30 सप्टेंबर 2023 या कालावधीतील तपासणी पंधरा दिवसांत पूर्ण करण्याचे आदेश होते. मात्र, तीन महिन्यांनंतरही अहवाल दाखल झाला नसल्याने याबाबत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करीत कारवाईचा इशारा दिला आहे.

मुलाणी समितीच्या अहवालानुसार पाच की सहा संचालक मी अपात्र केले आहे. पुढचे निर्णय सरकार घेईल. मी निर्णय देताना कोणालाच संरक्षण दिले नाही आणि वाचविले नाही. मुलाणी समितीच्या अहलावालानुसार त्याची अंमलबजावणी जिल्हा उपनिबंधक करीत नसतील तर त्यांच्यावर कारवाई करू. पुणे बाजार समितीत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला. जो जो चुका करेल त्याच्यावर कारवाई होईल. मलाही निर्णय देताना अनेक अडचणी येतात. पुणे बाजार समितीमधील कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार सिद्धच झाला नसता, तो मीच कारवाई करीत सिद्ध केल्याचेही त्यांनी सांगितले.

मीडिया से डरता हूँ…

मैं सबसे जादा मीडिया से डरता हूँ और सबसे ज्यादा प्यार भी मीडिया से करता हूँ. कधी काही ब—ेकिंग न्यूज येईल सांगता येत नाही. मीडियाच्या योगदानामुळे सर्वत्र माहिती तत्काळ मिळते. त्याप्रमाणे मिलेट महोत्सवाची माहितीही सर्वत्र पोहचवावी, अशी अपेक्षा त्यांनी या व्यक्त केली.

'मिलेट महोत्सवा'ला कायमस्वरूपी जागा देण्यासाठी प्रयत्नशील

प्रत्येकाच्या शरीराचे आरोग्य सुरक्षित, तंदुरुस्त व सक्षम ठेवण्यासाठी तृणधान्यांची गरज असून, ग्राहकांबरोबर नवीन पिढीलाही त्याचे महत्त्व कळणे आवश्यक आहे. त्यामुळे केवळ काही दिवसांसाठी 'मिलेट महोत्सव' (तृणधान्य) भरवून चालणार नाही, तर राज्यात महानगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायती आणि ग्रामपंचायतींमध्ये कायमस्वरूपी स्टॉल्सना जागा उपलब्ध करून देण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे, अशी ग्वाही पणनमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली.

राज्य कृषी पणन मंडळाच्या श्री गणेश कला क्रीडा मंदिरात 'मिलेट महोत्सव 2024' आयोजित केला असून, त्याचे उद्घाटन बुधवारी (दि. 17) सकाळी त्यांच्या हस्ते झाले. 21 जानेवारीपर्यंत सुरू राहणार्‍या या महोत्सवात विविध तृणधान्यांचे सुमारे 40 स्टॉल्स असून, त्यांना भेटी देत पणनमंत्री सत्तार यांनी उत्पादनांची माहिती जाणून घेतली. या वेळी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम, पणन संचालक डॉ. केदारी जाधव, पणन सहसंचालक मधुकांत गरड, पुणे विभागीय उपसरव्यवस्थापक राजेंद्र महाजन आदी उपस्थित होते.

सत्तार म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यांशी चर्चा करून तृणधान्ये विक्रीसाठी शहरांमध्ये कायमस्वरूपी स्टॉल्स उपलब्ध करून देण्यासाठी आदेश काढण्यात येईल. पुण्यात असणार्‍या रिकाम्या जागेवर मिलेटचे स्टॉल्स मिळण्यासाठी मी पुणे मनपा आयुक्तांशी चर्चा करणार आहे. निरोगी जगण्यासाठी तृणधान्यांचे महत्त्व अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहचविण्यासाठी पणन विभाग काम करीत आहे. तृणधान्य विक्रीमध्ये येत असलेल्या अडचणी महिला बचत गटांनी सांगण्याचे आवाहनही त्यांनी केले. संजय कदम यांनी प्रास्ताविक केले.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT