पुणे: गुजरातमधील साबरमती नदीकाठ विकास प्रकल्पाने देशभरात आदर्श निर्माण केला असून, त्याच धर्तीवर पुण्यातील मुळा-मुठा नदीकाठचा सर्वांगीण विकास करण्याचा महत्त्वाचा निर्णय पुणे महापालिकेने घेतला आहे. या महत्त्वाकांक्षी योजनेला चालना देण्यासाठी संगमवाडी परिसरातील संरक्षण विभागाच्या ताब्यातील सुमारे 10 एकर जागा आता महापालिकेच्या ताब्यात आली आहे. या जागेसह हरित पट्ट्याचाही समावेश असून, त्याबदल्यात संरक्षण विभागाला 32 कोटी रुपये देण्याच्या प्रस्तावाला स्थायी समितीने सोमवारी मान्यता दिली आहे.
मुळा-मुठा नदीसुधारणा प्रकल्प हा गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेचा विषय राहिला आहे. या प्रकल्पासंदर्भात पर्यावरण, प्रदूषण नियंत्रण, पुनर्वसन तसेच स्थानिक नागरिकांच्या हक्कांबाबत न्यायालयात विविध याचिका दाखल झाल्या होत्या. मात्र, सर्व कायदेशीर अडथळे दूर करीत आता हा प्रकल्प प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या टप्प्यात पोहचला आहे. पर्यावरणीय संतुलन राखत आणि नागरिकांच्या हिताचा विचार करून हा प्रकल्प राबविण्याचा निर्धार महापालिकेने केला आहे.केंद्र सरकारकडून मुळा-मुठा नदीसुधारणा प्रकल्पाच्या पाहणीसाठी नुकतेच एक विशेष तज्ज्ञ पथक पुण्यात दाखल झाले होते. साबरमती नदीकाठ विकास प्रकल्प यशस्वीपणे राबविणाऱ्या या पथकासमोर महापालिका आयुक्तांनी संपूर्ण प्रकल्पाचा सविस्तर आराखडा सादर केला. पुण्याची भौगोलिक रचना, नदीचा नैसर्गिक प्रवाह, पूररेषा तसेच वाढता नागरी विस्तार लक्षात घेऊन या पथकाने आवश्यक सूचना दिल्या आहेत.
नदीकाठ परिसराचा टप्प्याटप्प्याने करणार विकास
पुणे शहरातून मुळा नदीचा सुमारे 17 किलोमीटर, तर मुठा नदीचा सुमारे 12 किलोमीटर लांबीचा प्रवाह जातो. या संपूर्ण नदीपात्राचा टप्प्याटप्प्याने विकास केला जाणार आहे. या प्रक्रियेत केवळ सौंदर्यीकरण न करता नदीचे नैसर्गिक स्वरूप जपणे, जैवविविधतेचे संवर्धन करणे आणि प्रदूषण कमी करणे, हे प्रमुख उद्दिष्ट असणार आहे. सांडपाणी थेट नदीत जाणे थांबविणे, आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने पाणी शुद्धीकरण करणे तसेच पूरनियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना राबविण्यावर विशेष भर दिला जाणार आहे. यासोबतच नदीकाठावर पदपथ, सायकल ट्रॅक, उद्याने, थीम पार्क, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांसाठी जागा निर्माण करण्याचाही आराखडा आहे.
संरक्षण विभागाला दिले जाणार 32 कोटी
नदीसुधार प्रकल्पाच्या दृष्टीने संगमवाडी परिसर अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. सादल बाबा दर्गा ते संगमवाडी यादरम्यानची ही सुमारे 10 एकर जागा शहराच्या मध्यवर्ती भागात असल्याने विकासाच्या दृष्टीने मोलाची आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून या जागेचे मूल्यांकन करण्यात आले असून, त्यानुसार संरक्षण विभागाला 32 कोटी रुपये दिले जाणार आहेत.
प्रकल्पासाठी तज्ज्ञ सल्लागारांची नियुक्ती
महापालिकेने यासाठी तज्ज्ञ सल्लागारांची नियुक्ती केली असून, नदीसुधारणेचा तांत्रिक आराखडा, पर्यावरणीय परिणामांचा अभ्यास, प्रदूषण नियंत्रण, नदीकाठ संवर्धन आणि सुशोभीकरण, या सर्व बाबींचा समावेश प्रकल्पात करण्यात आला आहे. नागरिकांसाठी मोकळ्या जागा, विरंगुळ्याची ठिकाणे आणि सार्वजनिक वापरासाठी पायाभूत सुविधा विकसित करण्यावर भर देण्यात येणार आहे.
विविध सुविधा उभारण्यात येणार
या जागेवर सार्वजनिक उद्याने, नागरिकांसाठी विरंगुळ्याची ठिकाणे, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांसाठी सुविधा, पर्यावरणपूरक पायाभूत रचना तसेच पार्किंग सुविधा उभारण्याचा विचार महापालिकेने सुरू केला आहे. या विकास प्रक्रियेत स्थानिक नागरिक, सामाजिक संस्था आणि लोकप्रतिनिधी यांच्याशी सविस्तर चर्चा करून अंतिम आराखडा निश्चित केला जाणार आहे.