Ward 21 PMC Election Pudhari
पुणे

Ward 21 PMC Election: वाहतूक कोंडी, ड्रेनेजची दुरवस्था अन्‌‍ पुनर्वसनाचे प्रलंबित प्रश्न; नागरिक त्रस्त

मार्केट यार्डातील अवजड वाहतुकीमुळे कोंडी; झोपडपट्टी पुनर्वसन व म्हाडाच्या पूरग्रस्तांच्या चाळीचा प्रश्न कागदावरच; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त

पुढारी वृत्तसेवा

प्रभाग क्रमांक 21 मुकुंदनगर-सॅलिसबरी पार्क

मुकुंदनगर-सॅलिसबरी पार्क या प्रभागात (क्र.21) तीन मोठ्या झोपडपट्टी, मार्केट यार्ड, आयकर कार्यालय, अनेक बँका, अनेक उच्चभ्रू सोसायट्या आणि पूरग्रस्तांच्या वसाहतीचा समावेश आहे. या प्रभागात रखडलेला झोपडपट्टी पुनर्वसन व विकास प्रकल्प आणि म्हाडाच्या पूरग्रस्त चाळीतील घरांचा प्रश्नही प्रलंबित आहे. तसेच रस्त्यांची दुरवस्था, वाहतूक कोंडी, ड्रेनेज लाइनची दुरवस्था, पाणीपुरठा, कचरा, अतिक्रमणे आदी समस्या आहेत. क्रीडांगणांचा या भागात अभाव असल्याचे नागरिकांनी सांगितले.

अनिल दाहोत्रे

या प्रभागाची लोकसंख्या 80 हजार 82 इतकी आहे. गेल्या साडेतीन वर्षांत महापालिकेत प्रशासकराज असल्याने परिसराच्या विकासाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. झोपडपट्ट्यांमधील नागरिक सत्ताधारी आणि प्रशासनाच्या कामकाजावर नाराज आहेत. मार्केट यार्डातील जडवाहनांच्या वाहतुकीमुळे परिसरात कायम वाहतूक कोंडी होत असल्याने नागरिक हतबल झाले आहेत. झोपडपट्टी पुनर्वसन व विकास प्रकल्पाचे काम मागील दोन वर्षांपासून कागदावरच आहे. चौकांमध्ये सीसीटीव्ही कॉमेरे, ग्रेड सेपरेटर, सिग्नलचे दिवे, उड्डाणपूल आणि पदपथांची कामे प्रलंबित आहेत.

म्हाडाच्या पूरग्रस्त चाळीबाबत धोरण नसल्याने घरांचे प्रश्न तीन, तीन पिढ्यांपासून प्रलंबित आहेत. हा प्रश्न सोडविण्याची मागणी गेल्या काळात रहिवाशांनी माजी नगरसेवकांकडे केली होती, परंतु याबाबत माजी लोकप्रतिनिधींचाही निरुत्साह दिसून आला. पाटबंधारे विभागाच्या जागेवर अनेक अतिक्रमणे असून, याबाबत प्रशासन निद्रित असल्याने परिसरात विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. केंद्र सरकारच्या ईएसआय हॉस्पिटलमध्ये ससून रुग्णालयाच्या धर्तीवर अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. मात्र याकडेही सरकारचे दुर्लक्ष होत आहे.

प्रभागात झालेली विकासकामे

डॉ. बाबासाहेब आंबडेकर उड्डाणपूल

काही ठिकाणी रस्त्यांचे रुंदीकरण

सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत सुधारणा

प्रभागातील उद्यानांचा विकास आणि सुशोभीकरण

प्रभागातील प्रमुख समस्या

रस्ते, पदपथांसह कालव्यालगत अतिक्रमणे

झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प प्रलंबित

गंगाधाम चौकातील उड्डाणपूल प्रलंबित

वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त

क्रीडांगणे, ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रांचा अभाव

झोपडपट्टीतील ड्रेनेजलाइन, स्वच्छतागृहांची झालेली दुरवस्था

प्रभागात या भागांचा समावेश

स्वारगेट कॉर्नर, मुकुंदनगर, महर्षीनगर, टी. एम. व्ही. कॉलनी, सॅलिसबरी पार्क, लुल्लानगर, शिवनेरीनगर, गुलटेकडी इंदिरानगर, आदीनाथ सोसायटी, छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड, प्रेमनगर झोपडपट्टी, आंबेडकर झोपडपट्टी, शंकरशेठ रस्ता, सेव्हन लव्हज चौक, कोंढवा, गंगाधाम चौक, फख्री हिल्स.

मीनाताई ठाकरे वसाहतीत अवेळी पाणीपुरवठा होत आहे. अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. ड्रेनेज लाइन तुंबत असल्याने दुर्गंधीयुक्त पाणी उघड्यावरून वाहत आहे. तसेच ठिकठिकाणी कचराचे ढीग साचत आहेत.
तौशिक पठाण, रहिवासी
प्रभागात डॉ. बाबासाहेब आंबेडकर उड्डाणपुलाची उभारणी केली. वातानुकूलित ग्रंथालय आणि बहुउद्देशीय हॉल, व्यायामशाळा आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या. बिल्डरच्या ताब्यातील जागा मिळवून त्या ठिकाणी 6 कोटी खर्चाचे सुसज्ज उद्यानाची निर्मिती आहे. मनपा शाळेतील विद्यार्थ्यांसाठी अद्ययावत क्रीडांगण, संगणक कक्ष आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या. उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्या भूमिगत केल्या आहेत.
श्रीनाथ भीमाले, माजी नगरसेवक
आंबेडकरनगरमध्ये ड्रेनेज लाइन, स्वच्छतागृह आणि पथदिव्यांचा अभाव आहे. परिसरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. क्रीडांगणाचा देखील अभाव आहे. तसेच नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध होण्यासाठी सुसज्ज रुग्णालयाची गरज आहे.
अक्षय वायाळ, रहिवासी
पुजारी उद्यानाचे सुशोभीकरण करून या ठिकाणी व्यायामाचे साहित्य उपलब्ध केले आहे. महर्षीनगर येथील श्री संत नामदेव माध्यमिक शाळेत अत्याधुनिक प्रयोगशाळा आणि ग््रांथालय उभारले. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीतील फिश मार्केटचा प्रस्ताव रद्द करण्यासाठी प्रयत्न केले. प्रेमनगर परिसरातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण केले.
प्रवीण चोरबेले, माजी नगरसेवक
गुलटेकडी औद्योगिक वसाहत परिसरात ड्रेनेज वाहिन्यांची दुरवस्था झाली आहे. स्वच्छतागृहांच्या देखभाल, दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. तसेच कचऱ्याच्या समस्येमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तसचे या भागात अशुद्ध पाणीपुरवठा होत आहे.
सागर निंबाळकर, हेमंत जगताप, रहिवासीb
गुलटेकडी औद्योगिक वसाहत परिसरात ड्रेनेज वाहिन्यांची दुरवस्था झाली आहे. स्वच्छतागृहांच्या देखभाल, दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. तसेच कचऱ्याच्या समस्येमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तसचे या भागात अशुद्ध पाणीपुरवठा होत आहे.
सागर निंबाळकर, हेमंत जगताप, रहिवासी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT