2600 Crore Pending Dues of MSRTC Employees
जळोची: एसटी कर्मचार्यांच्या वेतनासाठी दर महिन्याला सरकारकडून निधी उपलब्ध करून दिला जातो. गेली अनेक महिने मागणीप्रमाणे आवश्यक निधी येत नसल्याने कर्मचार्यांना नक्त वेतन देण्यात येत आहे.
कर्मचार्यांच्या वेतनातून कपात करण्यात आलेली साधारण 2600 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कमेची देणी संबंधित संस्थांकडे भरली नसल्याचे महाराष्ट्र एसटी कर्मचारी व विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी सांगितले. (Latest Pune News)
महामंडळाची आर्थिक स्थिती एकदम बिकट असल्याचे महामंडळानेच जाहीर केले आहे. एकूण उत्पन्न व खर्च याचा ताळमेळ बसत नसून कर्मचार्यांना सरकारकडून देण्यात येणार्या सवलत मूल्य प्रतिपूर्ती रक्कमेतून वेतन देण्यात येत आहे.
पूर्ण वेतन देण्यासाठी साधारण 480 कोटी रुपये इतकी रक्कम लागते. सवलत मूल्य प्रतिपूर्ती रक्कम 370 कोटी रुपये इतकी होत आहे. याचाच अर्थ साधारण 100 कोटी रुपये इतकी रक्कम एसटीला दर महिन्याला कर्मचार्यांच्या वेतनाला कमी पडत आहे. त्यामुळे कर्मचार्यांच्या वेतनातून कपात करण्यात आलेली वैधानिक देणी संबंधित संस्थाना भरलेली नाहीत.
थकीत रक्कम
भविष्य निर्वाह निधी 1200 कोटी, उपदान 1400 कोटी, रजा रोखीकरण 60 कोटी, एसटी बँक 25 कोटी, इतर वैधानिक देणी साधारण 100 कोटी रुपये. यांची आकडेवारी पाहिल्यास कर्मचार्यांच्या वेतनातून कपात करण्यात आलेली रक्कम संबंधित संस्थाना भरलेली नाही. कर्मचार्यांच्या मेहनतीचा पैसा संबंधित संस्थांना न भरणे हे चुकीचे आहे.
श्वेतपत्रिका काढून आर्थिक स्थितीचा लेखाजोखा सर्वांसमोर जाहीर करण्याचा धाडसी निर्णय घेणारे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी एक वेळचा पर्याय म्हणून थकीत रक्कम भरण्यासाठी सरकारकडून निधी उपलब्ध करून द्यावा, असे महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी सांगितले.
देणी जास्त दाखवून सदर वाटचाल खासगीकरणाकडे आहे. एक दिवस शासन तो दिवस दाखवेल.- बाळासाहेब गावडे, एसटी कामगार