Inspection Pudhari
पुणे

MSBTE Institution Inspection March 2026: MSBTE मार्च 2026 मध्ये अभियांत्रिकी, फार्मसी व आर्किटेक्चर संस्थांची पडताळणी

संस्थांनी 4 ते 12 मार्चदरम्यान ऑनलाईन माहिती भरणे आवश्यक; 18 ते 30 मार्चदरम्यान ऑफलाइन अवेक्षण केले जाईल, विलंब शुल्कासह 13-15 मार्चपर्यंत माहिती सादर करता येईल

पुढारी वृत्तसेवा

पुणे: महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ अर्थात एमएसबीटीईच्या माध्यमातून मार्च महिन्यात फार्मसी, अभियांत्रिकी, आर्किटेक्चर संस्थांची पडताळणी करण्यात येणार आहे. त्यासाठी संस्थांना 4 ते 12 मार्चदरम्यान त्यांच्या लॉगीनमधून माहिती भरावी लागणार असून, 18 ते 30 मार्चदरम्यान संस्थांची ऑफलाईन पडताळणी करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

एमएसबीटीईचे सचिव डॉ. मारुती जाधव यांनी दिलेल्या निर्देशानुसार, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद अर्थात एआयसीटीई मान्यताप्राप्त अभियांत्रिकी (स्वायत्त संस्थासह) पदविका संस्था, औषध निर्माणशास्त्र (फार्मसी) पदविका संस्था, वास्तुकला परिषद मान्यताप्राप्त पदविका संस्था तसेच शासन मान्यताप्राप्त अल्पमुदतीचे अभ्यासक्रम राबविणाऱ्या संस्थांचे द्वितीय संस्था अवेक्षण शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये 18 ते 30 मार्चदरम्यान ऑफलाईन करण्यात येणार आहे.

तरी मंडळाशी संलग्नित तसेच स्वायत्त सर्व अभियांत्रिकी, फार्मसी व वास्तुकला पदविका संस्था तसेच अल्पमुदतीचे अभ्यासक्रम राबविणाऱ्या संस्थांना संस्था अवेक्षणसंदर्भातील सर्व माहिती ऑनलाईन भरण्यासाठी 4 ते 12 मार्चपर्यंत संस्थेच्या लॉगीनमध्ये लिंक उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सर्व स्वायत्त संस्था, ज्या संस्थांचे फक्त एकच वेळ संस्था अवेक्षण केले जाते अशा संस्थांनी तसेच ज्या संस्थांचे एनबीए ॲक्रिडीटेशन झाले आहे अथवा ज्या संस्थांच्या अभ्यासक्रमांना एक्सलंट दर्जा मिळाला आहे, अशा सर्व संस्थानी देखील माहिती भरणे अनिवार्य आहे.

संस्थांनी 3 मार्च अखेरपर्यंतची माहिती भरणे आवश्यक असून, संबंधित माहिती 12 मार्चपर्यंत पूर्ण करून सादर करणे आवश्यक आहे. 13 ते 15 मार्च या कालावधीत अभियांत्रिकी, फार्मसी व वास्तुकला संस्थांसाठी 10 हजार आणि अल्प मदतीच्या अभ्याक्रमाच्या संस्थांसाठी 5 हजार एवढे विलंब शुल्क भरून संस्थांना माहिती सादर करता येईल. अवेक्षणासंदर्भातील माहिती न भरणाऱ्या संस्थांचे संलग्नीकरण काढून घेण्याची कार्यवाही मंडळामार्फत करण्यात येईल, याची सर्व संस्थांनी नोंद घ्यावी, असा इशारा देखील तंत्रशिक्षण मंडळाच्या वतीने देण्यात आला आहे.

माहिती भरताना अडचण आल्यास येथे करा संपर्क

संस्थांनी भरलेल्या माहितीनुसार ऑनलाईन प्रणालीद्वारे त्याचा उपयोग मंडळाच्या विविध उपक्रमांमध्ये करण्यात येत असल्याने संबंधित संस्थाप्रमुखांनी संबंधित माहिती अचूक व परिपूर्ण असेल याची खात्री करून घेणे गरजेचे आहे. माहिती भरताना तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यास 8355870544 / 8668545322 या मोबाईल नंबरवर किंवा acmonitoringomsbre.ac.in या ई-मेलवर संपर्क साधावा. त्याशिवाय कोणत्याही अडचणी असल्यास संबंधित विभागीय कार्यालयास कळविण्यात याव्यात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT