Pune MPSC Students Protest Pudhari
पुणे

Pune MPSC Students Protest: एमपीएससी विद्यार्थ्यांचे पुण्यात आंदोलन; ५१ विद्यार्थ्यांना नोटिसा

परवानगी नाकारल्यानंतरही आंदोलन सुरू; २९ क्लास व अभ्यासिका चालकांनाही पोलिसांची नोटीस

पुढारी वृत्तसेवा

पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) कारभाराविरोधात पुण्यात तीन वेगवेगळ्या ठिकाणी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. मात्र, या आंदोलनाला पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आली होती. तरी देखील ही आंदोलने सुरू करण्यात आली. त्यामुळे ही आंदोलने बेकायदेशीर असल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली असून, संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याचा देखील इशारा दिला आहे. दरम्यान, या पार्श्र्वभूमीवर पोलिसांनी मध्यभागातील २९ क्लास व अभ्यासिका चालकांसह ५१ विद्यार्थ्यांना नोटिसा बजावल्या आहेत.

प्रमुख मागण्यांसाठी स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून मागील चार दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. परीक्षा पद्धती, आयोगाच्या कारभारासह विविध मागण्यांसाठी विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. मात्र, आंदोलनासाठी आवश्यक परवानगी घेण्यात आलेली नसल्याने पोलिसांनी आयोजकांना आंदोलन करू नये, अशा सूचना दिल्या होत्या. तरीही आंदोलन सुरू ठेवण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

शहरातील एस. एम. जोशी पुलासह टिळक चौक तसेच शास्त्री रस्त्यावर हे आंदोलने सुरू आहेत. हजारोंच्या संख्येने या आंदोलनात विद्यार्थी सहभागी झाले आहेत. आंदोलनाचा आजचा चौथा दिवस पूर्ण झाला असून, याला आता विविध राजकीय तसेच वेगवेगळ्या क्षेत्रांतील व्यक्तींनी भेटी देण्यास सुरुवात केल्याचे दिसून येते. या आंदोलनांमुळे कायदा-सुव्यवस्थेसह वाहतुकीचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांकडून बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आंदोलनाच्या ठिकाणी पोलिसांकडून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे.

परवानगी नाकारल्यानंतर देखील हे आंदोलन सुरू ठेवल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी यापूर्वीच दिला होता. आंदोलनाच्या ठिकाणी केलेले चित्रीकरण, आयोजकांना दिलेल्या सूचना आणि नंतर सुरू असलेले आंदोलन याची माहिती संकलित करून त्यानुसार गुन्हे दाखल केले जाणार आहेत. आंदोलन करण्याचा अधिकार असला तरी सार्वजनिक ठिकाणी आंदोलनासाठी पोलिसांची पूर्वपरवानगी आवश्यक आहे. परवानगी नाकारल्यानंतरही आंदोलन सुरू ठेवल्यास आयोजक आणि संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले.

ड्रोनद्वारे चित्रीकरण ?

एस. एम. जोशी पुलावर सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान एक ड्रोन उडत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. हे ड्रोन कोणी आणि कशासाठी उडवले, यासंदर्भात पोलिस चौकशी करत आहेत. आंदोलनाचे शूटिंग किंवा इतर कारणांसाठी हे ड्रोन उडवले असल्यास त्यावर देखील कारवाई केली जाणार आहे. ड्रोनद्वारे चित्रीकरण करण्यासाठी पोलिसांची परवानगी आवश्यक असते. आंदोलनादरम्यान कोणीही अशी परवानगी घेतलेली नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT