पुणे: आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या एमपीएससीविरोधातील आंदोलनात गेल्या काही दिवसांपासून काही स्पर्धा परीक्षार्थी बेमुदत अन्नत्याग उपोषणाला बसले आहेत. आंदोलनात उपोषण करणाऱ्या सातपैकी ऋषिकेश गांगर्डे, सोमनाथ चव्हाण आणि गजानन शेळके या तीन स्पर्धा परीक्षार्थींनी उपोषण सोडत असल्याचे जाहीर केले. आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी दूध पाजून त्यांच्या उपोषणाची सांगता केली.
एस. एम. जोशी पुलावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याच्या प्रमुख मागणीसह विविध मुद्द्यांसाठी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी पाठिंबा दर्शवत स्वतः सहभाग घेतला आहे. उपोषणाला बसलेल्या सात विद्यार्थ्यांपैकी तिघांनी मध्यरात्री उपोषण सोडल्याची घोषणा केली. उपोषणामुळे तिघांच्या किडनीवर परिणाम होण्याचा धोका निर्माण झाल्याने तिघांनी उपोषण सोडल्याचे सांगण्यात आले. इतर चौघांचे उपोषण मात्र सुरू राहणार आहे.
सरकारची दडपशाही सुरू आहे
एस. एम. जोशी पुलावर आंदोलन केल्याप्रकरणी १५ आंदोलकांवर विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याच्या घटनेचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष विशाल तांबे यांनी तीव्र शब्दांत निषेध केला. तांबे म्हणाले, एकीकडे सरकार चर्चेचे नाटक करते आणि दुसरीकडे आंदोलकांवर गुन्हे दाखल करून आवाज दाबण्याचा प्रयत्न करते.
हा लोकशाहीचा गळा दाबण्याचा प्रकार आहे. ज्या आंदोलकांच्या मागण्या मान्य झाल्याचे सांगितले जाते, त्यांच्यावरच गुन्हे दाखल करणे, ही दुटप्पी भूमिका आहे. या दडपशाहीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आंदोलकांच्या पाठीशी सर्व शक्तीनिशी उभा राहील. हे गुन्हे तत्काळ मागे घेतले नाहीत, तर पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा तांबे यांनी दिला.
स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे महाराष्ट्रातील शहरी व ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थी वर्षानुवर्षे मेहनत घेतात. त्यांच्या परीक्षा, भरती प्रक्रिया, पारदर्शकता आणि आयोगाच्या कारभाराबाबत उपस्थित झालेल्या प्रश्नांबाबत केवळ आश्वासन न देता त्यांना वेळेत न्याय मिळाला पाहिजे. लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भूमिकेला माझा पाठिंबा आहे. मी सदैव विद्यार्थ्यांच्या सोबत राहीन. विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याऐवजी त्यांचे प्रश्न ऐकून घेऊन परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता निर्माण करणे, ही सरकारची व प्रशासनाची जबाबदारी आहे.डॉ. विश्वजित कदम, आमदार, काँग्रेस पक्ष