हडपसर: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ गेल्या अकरा दिवसांपासून सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश आले आहे. आंदोलनाचा वाढता दबाव लक्षात घेऊन आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी चौकशी पूर्ण होईपर्यंत सक्तीच्या रजेवर जाण्याची भूमिका जाहीर केली आहे. हा विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा विजय आहे, असे मत आमदार रोहित पवार यांनी हडपसरमध्ये पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
तसेच, चौकशी समितीचे सचिव तुकाराम मुंढे एमपीएससीतील गैरव्यवहार बाहेर काढतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. पवार म्हणाले, एमपीएससी परीक्षेतील पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान झाले असून, आयोगाच्या अध्यक्षांनी राजीनामा द्यावा, ही आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी होती. आंदोलनामुळे सरकारवर दबाव वाढला आणि अखेर अध्यक्षांनी सक्तीच्या रजेवर जाण्याचा निर्णय जाहीर केला. विद्यार्थ्यांच्या १५ मागण्या सरकारने मान्य केल्याचेही पवार यांनी सांगितले.
या प्रकरणाच्या चौकशीसाठी माजी न्यायमूर्ती दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या सचिवपदी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती केली आहे. समितीला ६० दिवसांत चौकशी पूर्ण करायची असून, भीमनवार यांच्यासह एमपीएससीचे माजी अध्यक्ष आणि सदस्यांचीही चौकशी होणार असल्याचे पवार यांनी सांगितले. मुंढे यांच्यासारख्या अधिकाऱ्याची सचिवपदी नियुक्ती झाल्याने या चौकशीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे, असेही त्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांच्या हितासाठी आंदोलनात सहभाग
विद्यार्थ्यांच्या आंदोलनात राजकीय व्यक्तींनी सहभागी होऊ नये, अशी भूमिका काही जणांनी मांडली होती. याबाबत बोलताना आमदार रोहित पवार म्हणाले, विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही आंदोलनात सहभागी झालो होतो. आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये आणि कोणतीही अनुचित घटना घडू नये, याकडे लक्ष दिले. विद्यार्थ्यांवरील दबाव आणि संभाव्य अडचणी लक्षात घेऊन आंदोलनाला योग्य दिशा देण्याचा प्रयत्न केला.
सुषमा अंधारेंच्या वक्तव्यावर नाराजी
सुषमा अंधारे यांनी केलेल्या वक्तव्यावर रोहित पवार यांनी नाराजी व्यक्त केली. 'केवळ भाषण देऊन निघून जाण्याऐवजी आंदोलनस्थळी थांबून विद्यार्थ्यांना साथ द्यायला हवी होती,' असे ते म्हणाले. विद्यार्थ्यांच्या एकजुटीमुळेच सरकारला निर्णय घ्यावा लागल्याचेही त्यांनी नमूद केले.