शिरूर(पुणे); पुढारी वृत्तसेवा : शिरूर येथील साहिल बांदल या गिर्यारोहकाने 77 व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत युरोप खंडातील सर्वोच्च माउंट एलब्रुस हे शिखर सर केले. तसेच, बेस कॅम्पवर 115 फूट लांबीचा तिरंगा फडकविण्याचा आगळावेगळा विश्वविक्रम प्रस्थापित केला. माउंट एलब्रुस जगातील 7 खंडांतील 7 सर्वोच्च शिखरांपैकी 5 व्या क्रमांकाचे शिखर असून, याची उंची 18 हजार 510 फूट आहे. जॉर्जिया देशाच्या सरहद्दीपासून 20 किलोमीटर अंतरावर हे शिखर आहे. हा पृथ्वीवरील सर्वांत उंच असलेल्यांपैकी एक निद्रिस्त ज्वालामुखी पर्वत आहे.
11 ऑगस्टपासून सुरू झालेल्या या मोहिमेत साहिल यास अनेक अडचणींचा सामना करावा लागला. वेगाने वाहणारे वारे, उणे 25 अंश सेल्सिअस तापमानावर मात करीत साहिलने 15 ऑगस्ट रोजी रशियन वेळेनुसार सकाळी साडेपाच वाजता शिखरमाथ्यावर तिरंगा ध्वज फडकविला.
या आधी साहिलने राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक शिखरे सर केली आहेत. 2019 मध्ये आफ्रिका खंडातील सर्वोच्च 'माउंट किलिमांजारो' हे शिखर सर करून तेथे सर्वांत मोठा राष्ट्रध्वज फडकविण्याचा विश्वविक्रम साहिलच्या नावे आहे. गिर्यारोहणातील बेसिक व अॅडव्हान्स कोर्स तसेच बेसिक रॉक क्लायम्बिंग कोर्स त्याने 'अ' श्रेणीसह पूर्ण केले आहेत. लवकरच दक्षिण अमेरिका खंडातील सर्वांत उंच 'माउंट अॅकोनकागुआ' शिखर सर करणार असल्याचे साहिलने या वेळी सांगितले.
हेही वाचा