Sassoon Hospital Kidney Transplant Pudhari
पुणे

Sassoon Hospital Kidney Transplant: आईच्या मूत्रपिंडामुळे मुलाला नवे आयुष्य; ससूनमध्ये यशस्वी किडनी प्रत्यारोपण

अत्यंत गरीब कुटुंबातील तरुणाला जीवनदान; ससून रुग्णालयात ३५वी मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी

पुढारी वृत्तसेवा

पुणे : पुण्यातील एका नामांकित महाविद्यालयात शिक्षण घेणार्‍या व आर्थिकदृष्ट्या अत्यंत गरीब कुटुंबातील 22 वर्षीय तरुणाला उच्च रक्तदाबामुळे दोन्ही मूत्रपिंडे खराब झाल्याचे निदान झाले. तरुणावर 7 जानेवारी 2023 पासून डायलिसिस सुरू करण्यात आले. मात्र, मूत्रपिंड निकामी होत असल्याने डॉक्टरांनी प्रत्यारोपणाचा सल्ला दिला. आईने मुलाला अवयवदान करण्यासाठी पुढाकार घेतला. ससून रुग्णालयात पस्तिसावी यशस्वी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पार पडली.

तत्पूर्वी डॉक्टरांनी प्रत्यारोपणाचा सल्ला दिल्यानुसार नातेवाईक आणि मित्र-मैत्रिणींनी अनेक खासगी रुग्णालयांत चौकशी केली. प्रत्यारोपणाचा अंदाजे खर्च 10 ते 15 लाख रुपये येत असल्याचे समजले. घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत गरिबीची असल्याने एवढा खर्च शक्य नव्हता. तरुणाचे वडील साफसफाईचे काम करत असून, त्यांना महिन्याला फक्त 13 हजार रुपये पगार मिळतो. तुटपुंज्या पगारामध्ये कुटुंबाच्या दैनंदिन गरजा पूर्ण करणेही अशक्य होते.

रुग्णाला व नातेवाईकांना ससूनमध्ये प्रत्यारोपण होत असल्याची माहिती मिळाली. शस्त्रक्रियेसाठी अत्यंत कमी खर्च येत असल्याचे समजल्यावर त्यांनी ससूनमध्ये चौकशी केली. समाजसेवा अधीक्षक सत्यवान सुरवसे व अरुण बनसोडे यांनी त्यांना आर्थिक मदत करणार्‍या अनेक संस्था, विविध शासकीय योजना यांची माहिती देऊन मार्गदर्शन केले. रुग्णाच्या कुटुंबाची पूर्ण माहिती घेऊन आईला अवयवदान करता येईल, याबाबत समुपदेशन केले.

मूत्रपिंड रोगतज्ज्ञ डॉ. संदीप मोरखंडीकर व डॉ. निरंजन आंबेकर यांच्या सल्ल्यानुसार सर्व वैद्यकीय तपासण्या केल्यानंतर आईचे मूत्रपिंड जुळत असल्याचे समजले. मानवी अवयव प्रत्यरोपण कायद्यानुसार कायदेशीर मान्यतेचा संपूर्ण प्रस्ताव समाजसेवा अधीक्षक यांनी विभागीय मानवी अवयव प्राधिकार समितीसमोर सादर केला. समितीने पूर्ण प्रस्ताव व सर्वांच्या मुलाखती घेतल्यानंतर सदर प्रत्यारोपण करण्यास मान्यता दिली.

प्रत्यारोपण शस्त्रक्रिया अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार, वैद्यकीय अधीक्षक डॉ. यल्लपा जाधव, शल्यचिकित्साशास्त्र विभागप्रमुख डॉ. लता भोईर व मानवी अवयव प्रत्यारोपण कार्यक्रमप्रमुख डॉ. किरणकुमार जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली 27 डिसेंबर रोजी पार पडली. यासाठी डॉ. हरिदास प्रसाद, डॉ. हर्षल भितकर, डॉ. निरंजन आंबेकर, डॉ. संदीप मोरखंडीकर, डॉ. सुरेश पाटणकर, डॉ. राजेश श्रोत्री, डॉ. हर्षद तोष्णीवाल, डॉ. विवेक बारेकर, डॉ. शार्दूल दाते, डॉ. सुरेखा शिंदे, डॉ. सुजित क्षीरसागर, मुख्य परिसेविका राजश्री कानडे, उज्ज्वला गरुड, शामा बंदीसोडे, अर्चना थोरात, मुख्य अधिसेविका विमल केदारी, प्रांजल वाघ यांनी सहभाग घेतला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT