मोरगाव: बारामती तालुक्यातील मोरगाव येथे दरवर्षी दसरा उत्सव मर्दानी शाही परंपरेत साजरा केला जातो. छत्रपती शाहू महाराज सातारकर यांच्या आज्ञेनुसार सुरू झालेली ही परंपरा आजही तितक्याच वैभवाने सुरू आहे. श्री मयूरेश्वर देवस्थान परिसरात गावकरी, मानकरी आणि भक्तगण उत्साहात सहभागी होतात.
दसऱ्या दिवशी पहाटे पाच तोफांच्या आवाजाने उत्सवाला सुरुवात होते. या तोफा सोनोरी येथील पानसे सरदारांनी दिल्या असून, वाघ कुटुंबीय मानकरी आहेत. दारूगोळ्याचे वाटप सासवडे कासार कुटुंबीय पाहतात, तर भरण्याचे काम जाधव, चव्हाण, जगताप, तावरे, सणस, पवार आदी मंडळी करतात. सकाळी गाडे परिवाराकडून मयूरेश्वराची पहिली पूजा केली जाते. ढेरे घराण्याकडून सकाळी धुपारती पार पडते. (Latest Pune News)
दुपारी तीन वाजता देवास पेशवेकालीन दागदागिने व पोशाख परिधान केले जातात. रात्री साडेआठ वाजता पालखी सिमोलंघनासाठी निघते. पालखीबरोबर दारूगोळ्याची आतषबाजी व दुष्ट प्रवृत्तीचे प्रतीक असलेल्या प्रतिकृतीचे दहन केले जाते. पिंजरी चढवण्याची मानकरी परंपरा शहा कुटुंबाकडे आहे.
पालखी फिरंगाईदेवी, बुद्धिमत्ता मंदिर, तुकाईमाता मंदिर, महादेव, मारुती, भैरवनाथ, काळकाईदेवी आदी मंदिरांना भेट देते. मार्गात ग््राामस्थ आतषबाजी करतात. सोनबाच्या मंदिरात आपटा पूजन होते. त्यानंतर वंशावळीचे वाचन, आपट्याचा प्रसाद व अंगारा वितरणाची मानकरी परंपरा पार पडते.
गावातील सर्व जाती-धर्मातील लोक या सोहळ्यात सहभागी होतात. पालखी धनगरवाडा, माळी-लोहार आळी, ग्रामपंचायत व चिंचेच्या बागेतून फिरत मुख्य पेठेत येते. शेवटी महादेव व मारुती मंदिरात आरती होऊन पालखी परत देवस्थानात आणली जाते. गुरव मंडळी पंचारतीने आरती करून उत्सवाची सांगता करतात. असा हा मोरगावचा राजेशाही मर्दानी दसरा परंपरेनं आजही तितक्याच थाटामाटात साजरा केला जात असल्याचे सिताराम दत्तात्रय धारक पुजारी (गुरव) यांनी सांगितले.
राजेशाही ऐतिहासिक तोफातून पालखीसमोर तोफ गोळ्यांची आतषबाजी केली जाते. दुसऱ्या छायाचित्रात श्री मयूरेश्वराची लोभस मूर्ती.