Indapur flood damage
इंदापूर जलमय! शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांचे नुकसान; कृषिमंत्र्यांनी केली पाहणीPudhari

Indapur flood damage: इंदापूर जलमय! शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांचे नुकसान; कृषिमंत्र्यांनी केली पाहणी

तालुक्यात पावसाची सर्वदूर हजेरी
Published on

इंदापूर: इंदापूर शहरासह तालुक्यात गेली दोन दिवस सर्वदूर जोरदार पाऊस झाला आहे. यामुळे शहरातील काही भाग जलमय झाला होता. दुकानांत पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचे नुकसान झाले आहे, तर शेतकऱ्यांनाही मोठा फटका बसला आहे.

येथे शुक्रवारी (दि. 26) रात्री झालेल्या पावसामुळे शहरातील पानदरा परिसर जलमय झाला होता. त्यामुळे अनेकांच्या दुकानात, खासगी हॉस्पिटलमध्ये पाणी शिरून मोठे नुकसान झाले. इंदापूरचे ग्रामदैवत इंद्रेश्वर व सिद्धेश्वर मंदिरातही पाणी शिरले होते. पावसाचे पाणी नाल्यात मावले नसल्याने रस्त्यावरून वाहत होते. त्यामुळे परिसरातील रस्तेही जलमय झाले होते. याचा वाहतुकीवर परिणाम झाला. (Latest Pune News)

Indapur flood damage
Elevated road project: नाशिक फाटा ते राजगुरुनगर एलिव्हेटेड रस्ता लांबणीवर, निविदा प्रक्रिया पुढे

यानंतर शनिवारी (दि. 27) सकाळीदेखील पावसाचा जोर वाढला होता. शहरातील बसस्थानक, पानदरा, कसबा, प्रशासकीय भवन, परिसरातील व्यापारी गावे व इतर ठिकाणी पावसाचे पाणी साचून तळ्याचे स्वरूप निर्माण झाले आहे. बसस्थानकाच्या रचना बझार येथील तळमजल्यातील अनेकांच्या दुकानात घुसलेले पाणी नगरपरिषदेच्या टँकरच्या सहाय्याने पंपाद्वारे उशिरापर्यंत काढण्याचे काम सुरू होते.

इंदापूर नगरपरिषदेची सर्व यंत्रणा शहरांमध्ये फिरत असून नागरिकांच्या पावसाच्या पाण्याच्या समस्या दूर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. शहरात अनेक ठिकाणी रस्ते खोदून विकासकामे सुरू आहेत. साचलेल्या पाण्याला वाट काढून देण्याचे काम सुरू आहे.

Indapur flood damage
Takli Bhima cremation ground: टाकळी भीमा येथील स्मशानभूमीची दुरवस्था

कसबा, पानदरा परिसरात झालेल्या बांधकामामुळे नाल्याची रुंदी कमी झाली आहे, त्यातून पाणी जाण्यास अडथळा होत आहे. ते पाणी थेट रस्त्यांवर येत आहे. त्यामुळे नाल्याचे रुंदीकरण करण्यासाठीचा प्रस्ताव तत्काळ पाठविण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी रमेश ढगे यांनी सांगितले.

बावडा येथे 64 मि.मी. पाऊस

बावडा परिसरात शनिवारी (दि. 27) पहाटेपासूनच ढगांचा गडगडाट तर विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरू झाला. येथे शनिवारी पहाटे 64 मिलिमीटर एवढी पावसाची नोंद झाली आहे.

लवकरच उपाययोजना

कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर शहरात पाणी साचलेल्या भागांची पाहणी केली. या वेळी त्यांनी नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांना धीर देत, नागरिकांशी या अडचणीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी तत्काळ उपायोजना करू, असे आश्वासित केले. भविष्यात मोठा पाऊस येऊन नुकसान होऊ नये यासाठी भूमिगत नाला व रुंदीकरण करून पावसाच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावणार असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news