मोरगाव: अष्टविनायकांपैकी आद्य तीर्थक्षेत्र असलेल्या मोरगाव येथील श्री मयूरेश्वराच्या राजेशाही विजयादशमी (दसरा) सीमोल्लंघन सोहळ्यासाठी येणाऱ्या भाविकांनी तसेच मंदिर परिसरात शिस्त व सुरक्षितता राखली जावी, यासाठी जय गणेश प्रतिष्ठानच्या सदस्यांकडून चौकात आणि मंदिराच्या दर्शनी भागात नियम व सूचनांचे फलक लावण्यात येत आहेत.
दसरा उत्सव सोहळ्यासाठी आलेल्या सर्व भाविकांनी नियम व सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, अन्यथा कोणत्याही दुर्घटनेस ग्रामस्थ मंडळी जबाबदार राहणार नाहीत, असे प्रतिष्ठानने स्पष्ट केले आहे. भाविकांनी पोलिस प्रशासनास सहकार्य करावे, संपूर्ण परिसरावर पोलिस यंत्रणेचे बारकाईने लक्ष राहणार आहे, याची सर्वांनी नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
भाविकांनी पाळावयाचे नियम पुढीलप्रमाणे:
शोभेच्या दारूची आतषबाजी सुरू असताना, तसेच शोभेच्या दारूच्या साठ्यापासून २० ते २५ फूट अंतरावर उभे राहून आतषबाजीचा आनंद घ्यावा.
सोहळ्यासाठी येणाऱ्या सर्व भाविकांनी सुती (कॉटन) किंवा जाड कपडे परिधान करावेत.
सोहळा पाहण्यासाठी येणाऱ्या भाविकांनी स्वतःच्या जबाबदारीवर यावे.
मौल्यवान दागिने परिधान करून येऊ नयेत.
मद्यपान किंवा धूम्रपान करून येऊ नये.
सोहळ्यादरम्यान वाद-विवाद, चेष्टामस्करी करू नये, तसेच ठिकठिकाणी गर्दी करून थांबणे टाळावे.
ग्रामस्थांनी आपले पाहुणे व नातेवाईक यांना सोहळ्यात आणताना त्यांची जबाबदारी स्वतः घ्यावी.
प्रशासनाच्या आदेशानुसार दसरा सोहळ्यात लवंगी, सुतळी बॉम्ब, फटाक्यांच्या माळा इत्यादींवर संपूर्ण बंदी आहे.