Morgaon Bus Stand Pudhari
पुणे

Morgaon Bus Stand Facilities Problem: मोरगाव बसस्थानकात सुविधांचा अभाव; प्रवाशांचे हाल सुरूच

पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह आणि दिवाबत्ती बंद; प्रवाशांकडून नाराजी वाढली

पुढारी वृत्तसेवा

मोरगाव: बारामती तालुक्याच्या पश्चिम जिरायत भागातील अष्टविनायकाचे आद्य तीर्थक्षेत्र असलेल्या मोरगाव येथील बसस्थानकात पायाभूत सुविधांचा प्रचंड अभाव असल्याने प्रवाशांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. या बसस्थानकातून बारामती आगारासह इतरही अनेक आगारांच्या बसगाड्या नियमित धावतात. दररोज येथे हजारो भाविक, प्रवासी, शाळकरी विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिक येत असतात. मात्र, मूलभूत सोयींअभावी या सर्वांनाच मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

बंद स्वच्छतागृहामुळे महिलांचे हाल

बसस्थानकातील स्वच्छतागृह दीर्घकाळापासून कुलूपबंद अवस्थेत आहे. लांब पल्ल्याच्या बसगाड्यांमधून येणाऱ्या प्रवाशांना, विशेषतः महिलांना यामुळे उघड्यावर शौचास जावे लागत आहे. यामुळे महिलांची मोठी कोंडी होत असून, त्यांच्या आरोग्याचा आणि सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, काही समाजकंटकांनी स्वच्छतागृहाच्या भिंतींचे नुकसान करून आतील साहित्याची मोडतोड केल्याचेही समोर आले आहे. सार्वजनिक मालमत्ता ही आपलीच समजून सर्वांनी तिची काळजी घेणे गरजेचे आहे, असे मत सुजाण नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

पाणी नाही, अंधाराचे सामाज्य

तीर्थक्षेत्राचे ठिकाण असूनही बसस्थानकात प्रवाशांसाठी पिण्याच्या पाण्याची कोणतीही सोय नाही. उन्हाळ्यात व इतर ऋतूंमध्येही प्रवाशांना पाण्यासाठी वणवण करावी लागते. याशिवाय, गेल्या एक महिन्यापासून बसस्थानकातील दिवाबत्तीची (लाइट्‌‍स) सोय पूर्णपणे बंद आहे. रात्रीच्या वेळी संपूर्ण बसस्थानकात सर्वत्र अंधार असतो, ज्यामुळे सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

आगारप्रमुखांचे आश्वासन

मोरगाव बसस्थानकातील या सर्व गंभीर समस्यांबाबत बारामतीचे आगारप्रमुख प्रवीण शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी या सर्व बाबींची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित विभागामार्फत युद्धपातळीवर सुविधा पूर्ववत केल्या जातील, असे आश्वासन दिले आहे. आता या आश्वासनाची प्रत्यक्षात पूर्तता कधी होते, याकडे ग््राामस्थांचे लक्ष लागले आहे.

प्रमुख मागण्या आणि गरजा

  • वाहतूक नियंत्रक कक्ष : मोरगाव स्थानकात कायमस्वरूपी वाहतूक नियंत्रकाची (ट्रॅफिक कंट्रोलर) नियुक्ती करावी; जेणेकरून बसचे नियोजन योग्यरीतीने होईल.

  • पिण्याचे पाणी : प्रवाशांसाठी तत्काळ शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी.

  • स्वच्छतागृह दुरुस्ती : बंद असलेले स्वच्छतागृह दुरुस्त करून ते तातडीने खुले करावे.

  • दिवाबत्ती सोय : रात्रीच्या सुरक्षेसाठी बंद असलेले दिवे त्वरित सुरू करण्यात यावेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT